रात्रीपासून पाऊस बरसत असल्याने चाकरमान्यांची मोठी ससेहोलपट होत आहे. अनेकांची तारांबळ उडत आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याची कोणतीही बातमी सध्या तरी समोर आलेली नाही. पण पाऊस असाच कोसळत राहिला, तर रेल्वे वाहतुकीवर परिणाम पडण्याची भीती आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून जात असताना बंद पडत आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत.
advertisement
वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण
पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी पूल, मुलुंड टोलनाका येथे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई-नाशिक महामार्गावरही खारेगाव टोलनाका, साकेत परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेने निघालेल्या नोकरदारांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे.
रस्त्यांची बिकट अवस्था, नागरिकांचे हाल
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. डोंबिवलीच्या अनेक भागात, विशेषतः नवपाडा, गणेशनगर, टिळकनगर रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या जोरदार पावसाने मात्र येथील रहिवाशांचे हाल होत आहेत.
IMD च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत, नाऊकास्ट इशारा मिळाल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेण्यास मदत होईल. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि झाडांखाली किंवा जीर्ण इमारतींखाली थांबणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.





