ठाणे : केडीएमटीच्या (Kalyan Dombivli Municipal Transport) बस ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस गेल्या काही महिन्यांपासून आगारातच धूळ खात होत्या. प्रवाशांना त्यांचा काहीच वापर नव्हता, यावरून प्रशासनावर वारंवार टीका होत होती. आता मात्र मागच्या 20 दिवसांपासून यातल्या 4 इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. तर, उरलेल्या बस ऑगस्ट महिना अखेरीस रस्त्यावर उतरवण्याचा विचार असल्याचं कळतंय. त्यामुळे आता नागरिकांना जुन्या बसऐवजी नव्याकोऱ्या इलेक्ट्रिक बसनं प्रवास करता येणार आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील परिवहनच्या बस जुनाट झाल्यानं त्या कधीही, कुठंही बंद पडतील, अशी भीती असते. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळावी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं ई-बसचा पर्याय निवडण्यात आला. केंद्र सरकारनं राज्यात इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या कमी करून विद्युत यंत्रणेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या ताफ्यात 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून 207 विद्युत बस खरेदी करण्यात आल्या. यापैकी 10 बस मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या. परंतु काही कागदपत्रांची अपूर्तता आणि चार्जिंग स्टेशन नसल्यानं त्या आगारातच उभ्या होत्या.
ई-बसची चाचणी
मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक बस रस्त्यावर दिसू लागल्या आहेत. सध्या कल्याण-डोंबिवलीसाठी प्रत्येकी 2 बस चालवल्या जातात. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ई-बसची रस्त्यावर चाचणी घेण्यात आली होती. जुलैअखेरीस कल्याणमधील बिर्ला कॉलेज ते रिंगरूट मार्गावरून 2 ई-बस आणि डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी भागासाठी 2 ई-बस चालविण्यात येत आहेत.
खंबाळपाडा आगारात सुरू होणार चार्जिंग स्टेशन!
परिवहन विभागाकडून बाळासाहेब ठाकरे आगारात तात्पुरत्या स्वरूपात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलंय. पुढच्या टप्प्यात वाडेघर आणि खंबाळपाडा इथल्या आगारातही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे, याची निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच या कामाला सुरुवात होईल, असं परिवहन विभागाकडून सांगण्यात येतंय.