पालकांनी शाळेतील या निर्णयाचा खुलासा मागितल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीप्रमाणे विद्यार्थी जर शाळेत टिळा किंवा टिकली लावून आले तर शाळेत त्यांच्या कपाळावर लावलेला टिळा जबरदस्तीने पुसला जात असल्याचे घडत आहे. काही पालकांच्या मते यावेळी काही विद्यार्थ्यांना शाळेत मारही बसतो तसेच शाळेतील शिक्षकांनी पालकांना स्पष्ट केले आहे की, जर विद्यार्थी टिळा किंवा टिकली लावून शाळेत आले तर त्यांना शिस्तभंगासाठी शिक्षा केली जाईल.
advertisement
या निर्णयावर पालकांचा संताप व्यक्त होत असल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांच्याकडे केली. पालकांनी सांगितले की हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावना दुखावणारा असून त्यावर तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.
तक्रारीनंतर रुपेश भोईर यांनी कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाकडे प्रकरण पाठवले. महापालिका शिक्षण विभागानेही या घटनेची तातडीने दखल घेतली असून शाळेला नोटीस जारी केली आहे. नोटीसमध्ये शाळेच्या प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तसेच शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत आहे का याची शहानिशा करून कारवाई करण्यात येईल असेही महापालिकेने सांगितले.
शाळेच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप आणि आक्रोश निर्माण झाला आहे. पालकांच्या मते, टिळा, टिकली, बांगडी आणि राखी ही विद्यार्थ्यांच्या पारंपरिक आणि धार्मिक ओळखीशी संबंधित आहेत आणि या गोष्टींवर बंदी घालणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम करू शकते.
शिक्षण विभाग आणि महापालिकेने लवकरच शाळेतील परिस्थितीचा अहवाल तयार करून विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यामधील संवाद वाढवून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
आत्तापर्यंतची परिस्थिती पाहता कल्याणमधील के.सी. गांधी इंग्लिश स्कूलच्या निर्णयाने समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेच्या चर्चेला नवीन वळण दिले आहे आणि महापालिकेच्या पुढील पावल्या ही या प्रकरणात कितपत संतुलन साधतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.