येत्या काही काळात ठाणे महापालिका निवडणुका होणार आहेत. ठाणेकरांना या निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच निवडणुकीच्या तोंडावरच ठाणेकरांना खास सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
advertisement
या सुविधा मिळणार
रुग्णालयात दात स्वच्छ करणे, रुट कॅनल, दात काढणे, सिमेंट भरणे आदींसह इतर महत्त्वाच्या सुविधा मिळतील. पहिल्या टप्प्यात या सुविधा दिल्या जात असल्या तरी पुढील काळात दात इम्प्लांटसारख्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
निवडणुकीआधी आरोग्य सेवा
ठाणे महापालिकेच्या हद्दीत आयुष्यमान आरोग्य मंदिर टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. शहरातील काही प्रसूतिगृहांनी कात टाकली असून कळवा रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम केले जात आहे. अशातच आता ठाणेकरांच्या दातांच्या तपासण्या देखील मोफत होणार आहेत.
सर्वसामान्यांना फायदा
खासगी रुग्णालयात गेल्यावर साधा दात काढण्यासाठी एक ते तीन हजारांचा खर्च येतो. तर रुट कॅनल आणि इतर उपचारांचा खर्च अनेकांच्या खिशाला न परवडणारा असतो. त्यात रुग्णालयात दाखल करावे लागत नसल्याने मेडिक्लेममध्ये देखील दातांवरील उपचारांचा खर्च मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना ठाणे महापालिकेच्या या नव्या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.