या उड्डाणपुलाला लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. सध्या व्हीजेटीआय संस्थेमार्फत पुलाचा अभ्यास आणि सर्वेक्षण सुरू आहे. या अभ्यासात पुलाचा आराखडा, त्याचा रस्ते वाहतुकीवर होणारा परिणाम, वाहनचालकांना मिळणारा फायदा अशा विविध बाबींचा समावेश आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
advertisement
महापालिकेचा उद्देश आहे की येणाऱ्या महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याआधीच या पुलासाठी निविदा काढावी. या प्रकल्पात सर्वात मोठे आव्हान म्हणजे पुलाच्या मधल्या भागात असलेली नौदलाची जमीन होती. पुलापासून सुमारे 10 ते 12 मीटर अंतरावर नौदलाची जागा असल्याने त्यांनी सुरुवातीला आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे महापालिकेचे काम काही काळ थांबले होते. मागील दोन वर्षांपासून या संदर्भात महापालिका आणि नौदल यांच्यात अनेकदा पत्रव्यवहार झाला. अखेर नुकतेच नौदलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळाली आहे.
कसा असेल हा उड्डाणपूल
एलबीएस रोडवरील कल्पना सिनेमागृहापासून ते घाटकोपर सर्वोदय रुग्णालयापर्यंत साडेतीन किलोमीटरचा हा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. सध्या या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हा उड्डाणपूल घाटकोपर-अंधेरी लिंक रोडशी जोडला जाणार असून त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल. प्रवास वेळेत मोठी बचत होईल आणि वाहतुकीचा ताण कमी होईल.
नौदलाची जागा पुलाच्या अगदी जवळ असल्याने सुरक्षा कारणास्तव पुलाच्या त्या भागात सहा मीटरपेक्षा उंच दर्जेदार संरक्षक जाळे किंवा पत्रे बसवण्याचा विचारही सुरू आहे. यामुळे नौदलाच्या जागेतील हालचाली बाहेरून दिसणार नाहीत आणि सुरक्षाही कायम राहील.
या उड्डाणपुलामुळे केवळ कुर्ला ते घाटकोपर प्रवास सुसाट होणार नाही तर संपूर्ण पूर्व उपनगरातील वाहतूक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. महापालिकेच्या या प्रकल्पामुळे मुंबईतील नागरिकांना अखेर वाहतूक कोंडीमुक्त आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल.