या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याने आपलं राजकीय वजन वापरून पीडित तरुणीविरोधातच चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पण आता त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
advertisement
खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे मागील काही काळापासून प्रेमसंबंधात होते. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत तरुणीशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. याच वेळी आरोपीनं पीडितेच्या नकळत तिचे खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केले. तसेच त्याने तरुणीचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरुणीच्या आई-वडील आणि भावाला धमक्या देऊन ब्लॅकमेल केलं. आरोपीकडून सतत दबाव येत असताना, एके दिवशी आरोपीचा मोबाईल तरुणीच्या हाती लागला. त्यात तिचेच नव्हे, तर इतर मुलींचेही अश्लील व्हिडिओ सापडले.
तरुणीवरच चोरीचा आरोप
हे व्हिडिओ पाहून तरुणी हादरली पण तिने त्याचा मोबाईल आपल्याकडे ठेवला. ही बाब उघड झाल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी तरुणीच्या आई-वडिलांना आणि भावांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आपले राजकीय बळ वापरत पोलिसांकडे जाऊन उलट तरुणीवर मोबाईल चोरीचा आरोप केला. मात्र पोलिसांनी तरुणीची विचारपूस केल्यानंतर सत्य समोर आलं. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती आरोपीच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ लागले.
यानंतर पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात आरोपी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्याचं कळताच आरोपी फरार झाला असून खडकपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आरोपीनं अशाप्रकारे तरुणीचा आणि तिच्या कुटुंबीयांचा छळ केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.