ठाणे : स्त्री हा कुटुंबाचा महत्त्वाचा आधार आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे स्त्रियांच्या स्वावलंबनासाठी आणि पोषणासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' लागू करणार असल्याची घोषणा करण्यात आली. 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील, असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
advertisement
या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतील. त्यामुळे आता या योजनेबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महिलांना नेमकं या योजनेविषयी काय वाटतं, हेच लोकल18 च्या टीमने जाणून घेतलं.
लोकल18 शी बोलताना गृहिणी छाया शिंदे सांगतात की, 'एक गृहिणी म्हणून या योजनेकडे बघताना खरंच छान वाटतंय. सरकारही आम्हाला मदत करते, हे पाहून बरं वाटलं. आता पैसे खात्यात यायला सुरुवात झाली की स्वयंपाक पाण्याच्या गोष्टी आम्ही त्या पैशातून घेऊ शकू. म्हणजे घरातल्या कोणा एकावर याचा ताण येणार नाही. सरकारने असंच महिलांसाठी नवनवीन योजना आणायला हव्यात अशी इच्छा व्यक्त करते.'
21 वर्षांची विद्यार्थिनी करुणा शिंदे हिने सांगितले की, 'कॉलेजची विद्यार्थिनी म्हणून या योजनेकडे पाहताना मला वाटतं की 1500 पेक्षाही थोडी जास्त रक्कम या योजनेमध्ये हवी होती. परंतु ठीक आहे. काहीच नसण्यापेक्षा दीड हजारसुद्धा आम्हा विद्यार्थिनींसाठी महत्त्वाचे ठरतील. रोजचा प्रवास खर्च, वगैरे, या सगळ्या गोष्टी यातून करण्याचा प्रयत्न करू.'





