दोन्ही गावांना जोडणारा पूलच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील शेतकरी भाजीपाला, दूध तसेच सोयाबीन, उडीद, मूग यांसारखा माल बाजारपेठेत पोहोचवू शकत नाहीत. त्यामुळे अगोदरच संकटात असलेले शेतकरी आणखी त्रस्त झाले आहेत.
advertisement
गेल्या दहा दिवसांपासून या पुलाची अवस्था अत्यंत बिकट होत चालली होती. सततच्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढत गेला आणि अखेर पुलाचा जवळपास सगळा भाग वाहून गेला. त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी धोका पत्करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही.
स्थानिक नागरिकांच्या मते, या पुलाची दुरुस्ती किंवा नव्याने उभारणी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलली पाहिजेत. नाहीतर आगामी दिवसांत शेतकरी तसेच नागरिकांची अडचण अधिक वाढेल. बाजारपेठेशी संपर्क तुटल्याने शेतीमालाच्या नासाडीची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचं दिसून येत आहे.
सध्या या मार्गावर प्रवास करणे धोकादायक झाले असून गावकऱ्यांना पर्यायी रस्त्यांचा शोध घ्यावा लागत आहे. मात्र हे रस्ते लांब असल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्यास या भागातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.