अटल सेतूवर खासगी तसेच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना टोल न आकारण्याचा निर्णय अखेर अमलात आणला जात आहे. गुरुवार, 21 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून शुक्रवारपासून वाहनधारकांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
एप्रिलमध्ये झालेल्या घोषणेची अंमलबजावणी
एप्रिल महिन्यात राज्य सरकारने ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण’ जाहीर करताना, मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी जाहीर केली होती. त्यानुसार आता अटल सेतूवर माफी लागू झाली असून, पुढील दोन दिवसांत मुंबई–पुणे व समृद्धी महामार्गावरही टोलमाफीची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे हजारो ईव्ही वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. एप्रिलमध्ये टोलमाफीची घोषणा झाल्यानंतर टोल प्लाझावर ईव्ही वाहन धारकांकडून टोल वसुली सुरू होती. आदेश न निघाल्याने ही टोल माफी करता येत नसल्याचे टोल चालकांनी म्हटले होते. तर, ईव्ही वाहन चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये हुज्जतीचे प्रकार घडत होते.
advertisement
राज्य सरकारने या निर्णयामागे वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन उत्सर्जन, प्रदूषणकारी वायू आणि हरितगृह वायू कमी करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले आहे. शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये 50 टक्के सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
>> कोणत्या वाहनांना सवलत?
खासगी इलेक्ट्रिक कार
प्रवासी इलेक्ट्रिक कार
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस
शहरी परिवहन उपक्रमांच्या इलेक्ट्रिक बसेस
मात्र, मालवाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.