शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यासह बुधवारी दिल्लीत दाखल झाले. उद्धव ठाकरे आज इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्याआधी खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे या बैठकीला महत्त्व आले होते.
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले?
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री दिल्लीतील आपल्या पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक घेऊन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "सत्ता हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा आहे. जनहिताशी त्यांचा काहीही संबंध नाही," अशा शब्दांत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
advertisement
ही बैठक दिल्लीतील 15 सफदरजंग लेन येथील खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, "संसदेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या. सरकारला सळो की पळो करून सोडा."
ठाकरे यांनी केवळ धोरणात्मक चर्चा न करता खासदारांच्या वैयक्तिक व कार्यक्षेत्रातील अडचणीही समजून घेतल्या. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तसेच खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय (बंडू) जाधव, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होते.
