मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर परंपरेनुसार शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला उद्धव ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते, अनंत गीते, भास्कर जाधव, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते. भर पावसात झालेल्या मेळाव्याला शिवसैनिकांनी देखील प्रचंड उपस्थिती लावली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, घरं दारं वाहून गेली. शेतकरी आज विचारतोय काय खायचं, अशी परिस्थिती आज आली नाही. मराठवाड्यात आपत्ती आहे. संकट खूप मोठं आहे, लातूरला भूकंप झाला होता, तेव्हा आपण गावं दत्तक घेतली होती. आता आपण सरकारमध्ये नाही. पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी तरी द्यावी लागणार आहे. आजचे मुख्यमंत्री आहेत, ते ओला दुष्काळ वगैरे संकल्पना नसल्याचे सांगत आहेत म्हणूनच मी काल मुद्दाम पत्रकार परिषद घेतली. आपलं सरकार होतं तेव्हा हे बोंबलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा, पण आता तेच ओला दुष्काळ नाही म्हणत आहे. मी आजही तेच म्हणत आहे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करा. कोणतेही निकष ठेवू नका. आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही काहीही न पाहता कर्जमाफी केली होती, आताही तशाच कर्जमाफीची गरज आहे.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार
वाघाचं कातडे पांघरलेल्या कोल्ह्याची गोष्ट आपण ऐकली असेल, पण गाढवाने वाघाची चादर ओढलेले मी पहिल्यांदा पाहिले, अशा शब्दात भगव्या शालीवरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला. गद्दार गँग ही अमित शाह यांचे जोडे उचलणारे आहे. त्यांच्यावर किती आणि काय बोलायचं. हा मेळावा तसाचा घेतला जसा आजपर्यंत होत आहे. हा मेळावा चिखलात घ्यावा लागला. पण कमळाबाईच्या कारभारामुळे झाला आहे. कमळाबाईने जनतेच्या आयुष्याचं वाटोळं केलं आहे, असे ठाकरे म्हणाले.