शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पक्षाच्या काही बैठका घेतल्या. तर, काही पक्षांचे पक्ष प्रवेशही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडले. आता, उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची तोफ धडाडली आहे.
पहिल्या टप्प्यात 8 विधानसभा मतदारसंघातील दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत. सध्या ठाकरेंच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा कार्यक्रम समोर आला आहे. उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा रत्नागिरीतील राजापूरमध्ये होणार आहे. उद्धव ठाकरे हे राजापूरमध्ये विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत. या वेळी जवळच्या मतदारसंघाचे उमेदवार असतील.
advertisement
शिवसेना पक्ष फुटल्यानंतरची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली. मात्र, त्यात अपेक्षित यश ठाकरेंना मिळाले नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्याचे आव्हान ठाकरेसमोर आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात शिवसेना शिंदे गट आणि महायुतीचा कसा समाचार घेणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
>> उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांचा कार्यक्रम?
- 5 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजता रत्नागिरीतील राजापूर मध्ये सभा
- 6 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता भिवंडी ग्रामीणमध्ये सभा
- 6 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता बीकेसीतील महाविकास आघाडीच्या सभेत सहभागी होतील
- 7 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता दर्यापूर सायंकाळी 5 वाजता बडनेरा मध्ये सभा होईल
- 8 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता बुलढाणात सभा
- सायंकाळी 5 वाजता मेहकरमध्ये सभा तर सायंकाळी 7 वाजता परतूरमध्ये सभा होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
