त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली सरकारकडून हिंदी सक्ती करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मोर्चाची हाक दिली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या या हाकेला शिवसेना ठाकरे गट आणि इतर पक्ष, संघटनांनी साद देत मोर्चात सहभागी होण्याची तयारी दर्शवली होती. या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र, मोर्चा रद्द झाल्याने आता दोन्ही भाऊ हे विजयी मेळाव्यात दिसणार आहेत.
advertisement
ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गट आणि मनसे नेत्यांची पडद्याआडून चर्चा सुरू आहे. त्यावरून युतीच्या चर्चा सुरू आहेत.
राज ठाकरे यांनी काय म्हटले?
विजयी मेळाव्याबाबत राज ठाकरे यांनी म्हटले की, सरकारविरोधात सगळेजण एकवटले होते. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. मराठीसाठी सगळे एकत्र आले होते. 5 जुलै रोजीचा विजयी मेळावा देखील राजकारणाच्या पलिकडे पाहिला हवा असेही राज ठाकरे यांनी म्हटले. युती, आघाड्या या निवडणुकीच्या वेळी येत राहतील पण मराठी भाषा संपली की युती-आघाड्यांना काय अर्थ आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
विधिमंडळाच्या अधिवेशनाला आज शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या युतीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उद्धव यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्याचे वक्तव्य केले. निवडणुका जाहीर झाल्यानंतर युतीबाबत भाष्य करणार असल्याचे उद्धव यांनी संकेत दिले आहेत.