सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. तसेच सरकारने घोषित केलेल्या एक लाख रुपये दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर आले पाहिजे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत, तर केवळ मराठवाडाच नाही, तर संपूर्ण राज्यभर दौरा करून शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
advertisement
"राज्यातील शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही. कर्जातून मुक्त केलं नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरणार. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच मदतीची घोषणा केली नाही. आता राज्यात निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे मोदी घोषणा करून मतदारांना खूश करतील," असंही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते पदावरून देखील सरकारला धारेवर धरलं. सरकारकडून विरोधीपक्षनेतेपद दिलं जात नाही. तरीही आपण रस्त्यावर उतरणार आहोत. अशावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील तिथे यावं लागेल. कुणी अधिकारी मस्तीत वागला, तर शेतकऱ्यांचा आसूड काय असतो, ते दाखवून द्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.