शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी अचानकपणे दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि अनिल परब होते. तर, राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर होते. अनिल परब हे बैठकीसाठी आल्याने ही भेट राजकीय असल्याची चर्चा सुरू होती. अखेर सूत्रांनी समोर आलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणार्या दसरा मेळाव्यात राज आणि उद्धव यांच्या युतीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे.
advertisement
आज राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीसोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल परब देखील उपस्थित आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची ही भेट झाली असल्याची चर्चा आहे. आगामी मु्ंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जागा वाटप आणि काही महत्त्वाच्या जागांबाबत निर्णय झाल्याची शक्यता आहे.
उद्धव यांचा मविआला गुड बाय की राज यांची एन्ट्री?
राज ठाकरे यांनी मागील काही काळात हिंदुत्व, परप्रांतीय, मराठीच्या मुद्यावर घेतलेल्या भूमिका या महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या भूमिकांशी विसंगत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्यासोबत युती करताना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग होणार का, याकडेही लक्ष लागले आहे. राज यांच्यासोबतच्या युतीला इंडिया आघाडी, मविआने विरोध दर्शवल्यास उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडू शकतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेगळं समीकरणं?
मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवतील. तर, दुसरीकडे मविआतील घटक पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट हे आघाडीत निवडणूक लढवू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील समीकरणे लक्षात घेता ठाकरे बंधू आणि मविआतील इतर पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.