लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने भाजपला टक्कर देण्याचा जोरदार प्रयत्न केला. भाजपचे संख्याबळ काही प्रमाणात घटले. त्यानंतर मात्र, विरोधकांना हरयाणा, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर इंडिया आघाडी आणि मविआच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह दिसून आले.
काँग्रेसकडून हालचाली, उद्धव ठाकरेंना फोन...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस नेते के. वेणुगोपाल यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली. वेणुगोपाल यांनी इंडिया आघाडीची बैठक 19 जुलै रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत.
advertisement
इंडिया आघाडीच्या या बैठकीचा उद्देश विरोधी पक्षांची एकता दाखवण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीची बैठक न झाल्याने घटक पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून आले. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आणि बिहार निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीची पुन्हा जुळवाजुळव सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावर एकत्रितपणे प्रश्न मांडता यावे यासाठी इंडिया आघाडीची बैठक आवश्यक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिकपणे म्हटले होते. त्यानंतर आता काँग्रेसकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.