मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थवर दाखल झाले. उद्धव हे जवळपास 22 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. जवळपास दोन तास उद्धव ठाकरे हे कुटुंबीयांसह शिवतीर्थावर होते. शिवतीर्थावर ठाकरे बंधूंच्या भेटीत काय झाले, याची माहिती ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी दिली.
advertisement
राज ठाकरे यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 12.30 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल झाले. उद्धव यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानातील बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले.
ठाकरे बंधूंच्या भेटीत काय झाले?
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जवळपास 22 वर्षांनी आले. राज ठाकरे हे कृष्णकुंज या निवासस्थानाहून शिवतीर्थ या नव्या घरात आल्यानंतर उद्धव पहिल्यांदाच सहकुटुंब दाखल झाले. जवळपास दोन तास ठाकरे कुटुंब एकत्र होते.
महेश सावंत यांनी काय सांगितले?
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी म्हटले की, आज आनंदाचा दिवस आहे. खेळीमेळीचे वातावरण होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरातील बाप्पांचे दर्शन घेतले. आजच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. खूप वर्षांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट झाली असल्याचे सावंत यांनी सांगितले. मराठी माणसांची सगळ्यांचीच इच्छा आहे की एकत्र यावेत. मनसैनिक व शिवसैनिक भाऊ भाऊ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ठाकरे कुटुंब एकत्रितपणे दुसऱ्या मजल्यावर होते. त्या ठिकाणी ठाकरे कुटुंबाचे स्नेहभोजन झाले असल्याची माहिती सावंत यांनी दिली. तर, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे गणपती असलेल्या मजल्यावर होते अशी माहिती सावंत यांनी दिली.
10 मिनिटे स्वतंत्र चर्चा....
महेश सावंत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवला तरी दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्रपणे 10 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दोन्ही नेत्याशिवाय इतर कोणीही नव्हते. त्यामुळे आता या 10 मिनिटांच्या चर्चेत नेमकं काय झालं, यावर चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे बंधूंची निवडणुकीच्या मैदानात युती?
ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्याचा परिणाम मुंबई, पुणे, नाशिक , ठाणे, छत्रपती संभाजीनगर आदी महानगरपालिकांत होईल, असे सांगितले जात आहे. निवडणुकांच्या राजकारणात एकत्र येण्याआधी कुटुंब म्हणून ठाकरे बंधू अधिक जवळ आल्याचे संकेत दोघांनी दिले आहेत. कौटुंबिक सोहळ्यात दोन्ही भाऊ गप्पा मारताना दिसून आले आहेत.