मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला वेग आला असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जवळीक वाढत असताना महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षातही हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार का, याची चर्चा सुरू असताना राज ठाकरेंच्या शिलेदारानं यावर स्पष्ट भाष्य केलं आहे.
advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटीसाठी दाखल झाले होते. उद्धव ठाकरे हे जवळपास अडीच तास राज यांच्या निवासस्थानी होते. त्यानंतर युतीच्या चर्चांना वेग आला. आज राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे हे राज यांच्या मातोश्री आणि उद्धव यांच्या मावशी कुंदाताई यांना भेटण्यासाठी आले होते. कुंदाताई आणि उद्धव यांच्यात गप्पा झाल्याा. यावेळी राज ठाकरे देखील तिथे होते. दोन राजकीय नेते एकत्र आले की राजकीय चर्चा होणे स्वाभाविक आहे. राज आणि उद्धव यांच्यात 5-10 मिनिटे चर्चा झाली. त्यावेळी तिथं कोणीच नव्हते, त्यामुळे काय बोलणं झालं, याची माहिती कोणालाच नसल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यात युतीची घोषणा?
बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, दोन्ही राजकीय पक्ष वेगळे असून त्यांच्या काही परंपरा आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. तर, मनसेचा गुढी पाडवा मेळावा होतो. आपापले विचार आपल्या मंचावरून मांडतो. त्यामुळे मला असे वाटत नाही की त्यांनी काही निमंत्रण दिले आहे किंवा राज यांना सभेत बोलण्यासाठी आमंत्रित केले जाईल. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली जाईल, त्यामुळे अन्य नेत्यांना संधी नसेल असेही त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार?
युतीबाबत बोलताना बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, दोघे भाऊ मनाने एकत्रित येताना आम्हाला दिसत आहेत. एकंदरीत उद्धव ठाकरेंची यांची भुमिका बघितली तर ते दोघे भाऊ एकत्रित येण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. त्यासाठी ते काहीही निर्णय घेऊ शकतील. परंतू अजून या मुद्यावर चर्चा झाली नसल्याचेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले. दोन्ही पक्ष अजून एकत्र आलेले नाही त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे महाविकास आघाडीत जाणार?
बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, काही मुद्दे, विचारसरणीचा मुद्दा आहे. त्यामुळे युती, आघाडीबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल. दोन्ही पक्षांची युती अद्याप झाली नाही. त्यामुळे आपण यावर अधिक बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.