मुंबई : मराठी भाषेसाठी दोन ठाकरे भाऊ एकत्र आल्यानंतर आता गणेशोत्सव देखील ठाकरे बंधू एकत्रित साजरा करणार आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दाखल झाले आहेत. उद्धव हे जवळपास 20 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज ठाकरे हे उद्धव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर आज उद्धव हे दाखल झाले.
advertisement
राज ठाकरे यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 12.30 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल झाले. उद्धव यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवतीर्थावर आले. यावेळी माहिमचे आमदार महेश सावंत यांच्यासह शिवसेना ठाकरे गट, मनसेचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर ठाकरे कुटुंबीय हे एकत्र जेवणही करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबातील दुरावा संपला असल्याचे म्हटले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसह मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राजकीय मतभेद विसरून दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याने राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे म्हटले जाते.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्याचा परिणाम मुंबई, पुणे, नाशिक , ठाणे, छत्रपती संभाजीनगर आदी महानगरपालिकांत होईल, असे सांगितले जात आहे. निवडणुकांच्या राजकारणात एकत्र येण्याआधी कुटुंब म्हणून ठाकरे बंधू अधिक जवळ आल्याचे संकेत दोघांनी दिले आहेत. कौटुंबिक सोहळ्यात दोन्ही भाऊ गप्पा मारताना दिसून आले आहेत.
एक महिन्यानंतर दोन्ही बंधूंची भेट...
27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत चर्चा झाली. दोन्ही बंधूंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर आज एक महिन्यानंतर उद्धव ठाकरे हे राज यांच्या निवासस्थानी 22 वर्षांनी दाखल झाले. राज यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शनाचे निमित्त या भेटीसाठी असले तरी दोन्ही कुटुंबाचे मनोमिलन आणखी दृढ होणारा हा प्रसंग असल्याचे म्हटले जात आहे.