सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असून, ठाकरे गटाकडून विधानसभा निहाय निरीक्षक नेमून नियोजनबद्ध बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकीद्वारे स्थानिक पातळीवरील संघटन बांधणी, निवडणूक रणनीती, उमेदवार निवड प्रक्रिया आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यावर भर दिला जात आहे.
ठाकरे घेणार शिलेदारांसोबत बैठक...
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना भवन येथे मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार असून, महिला आणि पुरुष शाखा प्रमुखांना थेट मार्गदर्शन करणार आहेत.
advertisement
याआधी निरीक्षकांमार्फत गटनिहाय संवाद साधण्यात आला होता. मात्र आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः मैदानात उतरत, शाखा प्रमुखांना एकत्रित संबोधित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईतील विविध वॉर्डातील परिस्थिती, स्थानिक नेतृत्वाची ताकद, तसेच गेल्या काही वर्षांतील घडामोडींचा आढावा घेण्यात येणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
आज दादर येथील शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या पुरुष आणि महिला या दोन्ही शाखाप्रमुखांच्या बैठका पार पडणार आहेत. मुंबईतील 227 वॉर्डमधील शाखा प्रमुख हजेरी लावणार आहेत.
येत्या निवडणुका ठाकरे गटासाठी अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे सर्व पातळीवरील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात येत असून, पक्षाने निवडणुकीपूर्वी एकजूट दाखवण्यावर भर दिला आहे.
ठाकरेंसाठी शाखा प्रमुख ठरणार इम्पॅक्ट प्लेअर...
शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत शाखा प्रमुख हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. शाखाप्रमुख हे वॉर्डनिहाय असतात. त्याशिवाय, शाखाप्रमुखांचा स्थानिक पातळीवरील अनेक मुद्द्यात हस्तक्षेप असतो. स्थानिक जनतेमध्ये त्यांचा थेट संपर्क असतो. महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासाठी शाखाप्रमुखच महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. मात्र, स्थानिक पातळीवरील बहुतांशी शाखाप्रमुख हे ठाकरेंसोबत राहिले. आता, याच संघटनात्मक आधारावर ठाकरे मुंबई महापालिकेचे मैदान मारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.