मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. उद्धव ठाकरे हे लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. त्याशिवाय पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
advertisement
आज सकाळी 11 वाजता लातूर विमानतळ येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन होईल. तिथून ते लातूर तालुक्यातील काडगाव येथे सकाळी 11.30 वाजता पोहोचतील. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून तिथून ते धाराशिव जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता धाराशीवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात तर दुपारी दीड वाजता वाशी तालुक्यातील पारगावात उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा नियोजित आहे.
या जिल्ह्यांनादेखील देणार भेट...
उद्धव ठाकरे हे आज बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जाणार आहेत. बीडमधील कुर्ला येथे दुपारी दीड वाजता, जालनाच्या अंबड तालुक्यातील महाकाळा येथे साडेचार वाजता तर सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील रजापूर गावात जाऊन उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत.
आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शासनाकडे नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाईसाठी 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ही थकबाकी लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी त्यांनी केली. केवळ 2339 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे, पण मदतीचे प्रत्यक्ष वितरण होण्यास खूप वेळ लागतो, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांच्या जुन्या भाषणाची आठवण करून देताना शेतकर्यांच्या कर्जमाफीची ही योग्य वेळ असल्याचे म्हटले.