बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी 'न्यूज 18' शी बोलताना सांगितले की, विनोद तावडे हे आज 5 कोटींची रक्कम वाटण्यासाठी विरारमध्ये येणार आहेत. ही माहिती भाजपच्या नेत्याने दिली. त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी कारवाई केली असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
विनोद तावडेंचे मला 25 फोन...
ठाकूर यांनी पुढे म्हटले की, आमच्या कार्यकर्त्यांनी ही रक्कम पकडल्यानंतर तावडे यांनी मला 25 फोन केले. आपण हे प्रकरण थांबवूया, हे प्रकरण अधिक ताणू नये, माझी चूक झाली असे विनोद तावडे यांनी म्हटल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
advertisement
विनोद तावडे हे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या. मतदानापूर्वी 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का, असा सवालही त्यांनी केला. विनोद तावडे यांच्याकडील डायरीमध्ये काही कार्यकर्त्यांची नावे आणि रक्कम लिहिली होती. तावडे यांच्याकडे काही रोख रक्कमही सापडली असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
नेमकं काय झालं?
विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते. याबातची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले. यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवले.
