वर्धा : होळी या सणाला भारतभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरांचं पालन केले जातं. त्यातील अशीच एक परंपरा विदर्भात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे शेणापासून तयार होत असलेले गोळे किंवा चकऱ्या. गाईच्या शेणापासुन तयार होणाऱ्या या चकऱ्यांना 'चाकोल्या' सुद्धा म्हटलं जाते. आधी शेणाच्या चाकोल्यांची ही माळ होळीमध्ये अर्पण करून होळी पेटवली जायची. पूर्वीच्या काळात होळीची लगबग सुरू होताच घरोघरी विशेषतः वृद्ध आणि चिमुकले चाकोल्या बनवण्यात व्यस्त दिसायचे. मात्र आता आधुनिक काळात ही परंपरा कुठेतरी लुप्त झालेली दिसून येते. त्यामुळे आपली होळीची परंपरा कायम राहावी आणि गो सेवेला हातभार लागावा यासाठी वर्ध्यातील पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रम येथे गाईच्या शेणापासून चाकोल्या बनविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या चाकोल्या विक्री केल्या जात आहेत आणि विक्रीतून मिळालेले पैसे हे गो सेवेसाठी उपयोगात आणले जाणार आहेत.
advertisement
अशा बनतात चाकोल्या
गाई- बैलांच्या शेणाला चांगलं चुरून शक्य असल्यास त्यात थोडा भुसा अॅड करून हाताच्या बोटांचे वेगवेगळ्या आकाराचे एकप्रकारे साचे तयार केले जातात. मग त्यात शेण टाकून मधात एक छिद्र करून आकार दिले जातात. ज्यात, गोल, चौकोनी, त्रिकोणी, षटकोनी असे आकार असतात. या चाकोल्या उन्हात चांगल्या वाळवून झाल्यानंतर त्याच्या माळी तयार केल्या जातात. अशाप्रकारे वेगवेगळे आकार बघून चिमुकल्यांचा उत्साह वाढतो. होळीच्या पार्श्वभूमीवर हे काम आज अनेकांना रोजगार मिळवून देत आहे.
होळीच्या सणाला बंजारा समाजात लग्नाळू मुलांचं काय आहे महत्त्व? पाहा Video
पर्यावरणाचं होतं रक्षण
वेगवेगळ्या आकारांच्या चाकोल्या बनविण्यासाठी चिमुकल्यांमध्ये देखील उत्सुकता असायची मात्र आताच्या काळातील अनेक मुलांना चाकोल्या हा प्रकार माहीतही नसेल. ग्रामीण भागात मात्र काही ठिकाणी शेणापासून चाकोल्या बनवण्याची परंपरा सुरू असल्याचं दिसून येते. कारण अनेकजण चाकोल्या आयत्या विकत घेणं पसंत करतात. चाकोल्यामुळे होळी जाळण्यासाठी फार लाकडांची गरज पडत नाही. त्यामुळे पर्यावरणालाही चाकोल्या फायद्याच्या आहेत.
रंगांविना खेळली जाते होळी, महाराष्ट्रातलं असंही एक गाव, नेमकी ही परंपरा काय?
शहरात चाकोल्याना चांगली मागणी
करुणाश्रम येथे गाईचा गोठा आहे. त्यातलं शेण गोवऱ्या आणि चाकोल्या बनवण्यासाठी वापरलं जातंय. कोरोना काळापासून गोवऱ्या बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून चाकोल्या बनवण्याचाही उपक्रम पीपल फॉर एनिमल्स संस्थेच्या उपाध्यक्ष निवेदिता आशिष गोस्वामी यांनी हाती घेतलाय. तयार करण्यात आलेल्या या चाकोल्याची 1 माळ पन्नास रुपयांना विक्री केली जाते आहे. यापुढे देखील गोवऱ्या बनवण्याचं काम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.