मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयांमधून मुंबईला दररोज 3900 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची एकत्रित पाणी साठवण क्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतकी आहे. सध्या या धरणांमध्ये 14 लाख 07 हजार 218 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
यंदा सातपैकी 4 तलाव पूर्ण भरले असून अन्य 3 तलाव भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सात धरणांपैकी मोडकसागर तलाव सर्वात आधी भरला होता. 9 जुलै रोजी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला होता. त्यानंतर 23 जुलै रोजी तानसा तलाव भरला. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे 16 ऑगस्ट रोजी तुळशी आणि 18 ऑगस्ट रोजी विहार तलाव तुडुंब भरले.
यावर्षी जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसातच धरणं 50 टक्क्यांपर्यंत भरली होती. मात्र, जुलैच्या अखेरीस पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा पावासाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. सोमवारी (8 सप्टेंबर) सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत धरणक्षेत्रांत एकूण 245 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानुसार, सातही धरणांमधील पाणीसाठा 97.23 टक्के झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्तास तरी पाण्याचा प्रश्न मिटला आहे.