पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे. वरळी परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचलं असून वरळी डोम परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांची रहदारी विस्कळीत झाली आहे. वांद्रे आणि बीकेसी परिसरात रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
advertisement
Mumbai Weather: पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे सेवेलाही पावसाचा फटका बसला असून पश्चिम मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिरा धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. दुसरीकडे, झोपडपट्टी भागांमध्ये पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. धारावी, अंधेरी आणि सांताक्रूझ परिसरातील अनेक कुटुंबांना पाण्यामुळे घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जावं लागलं आहे.
रविवारी सकाळी 8 वाजून 30 मिनिटे ते सोमवारी पहाटे 5 वाजून 30 मिनिटांपर्यंची पावसाची आकडेवारी पाहता, कुलाबा येथे 88.2 मिमी, वांद्रे येथे 82 मिमी, भायखळा येथे 73 मिमी, टाटा पॉवर येथे 70.5 मिमी, जुहू येथे 45 मिमी, सांताक्रूझ येथे 36.6 मिमी तर महालक्ष्मी येथे 36.5 मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे.
मुंबईसोबतच राज्यातील इतर ठिकाणीही पावसाने जोर धरला आहे. पुणे घाट परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर घाट परिसर तसेच विदर्भातही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागात नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी पाणीपातळी वाढत आहे.