पत्नीच्या निधनाचा धक्का पतीला सहन झाला नाही. याच विरहात त्याने 2 दिवसात आपले प्राण सोडले. शेख जानी शेख निजामोद्दीन यांनी वयाच्या 74 व्या वर्षी प्राणत्याग केला. शेख जानी शेख निजामोद्दीन हे 10 वर्षांपूर्वी जेहणी वन विभागातून चौकीदार पदावरुन निवृत्त झाले होते. निवृत्ती वेतनाच्या आधारावर त्यांचं कुटुंब चालत होतं. सुखीसंसार सुरू होता.
advertisement
पाच वर्षांपासून पत्नी मरियम बानो अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त होती. 6 डिसेंबर रोजी मरियम बानो यांचं आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पत्नीच्या निधनाने शेख अत्यंत अस्वस्थ झाले. मानसिक धक्का बसला आणि विहर सहन न झाल्याने अखेर त्यांनी आपले प्राण सोडले.
8 डिसेंबर रोजी त्यांची तब्येत बिघडली, प्रकृती जास्त खालावायला लागली. उलट्या आणि चक्क येऊ लागली. कुटुंबियांनी त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांनी प्राण सोडले होते. शेख यांच्या पश्चात त्यांच्या दोन विवाहित मुली, सुना नातवंड असं कुटुंब आहे. नुकतीच विवाह होऊन सासरी गेलेल्या मुलीसाठी तर हा मोठा मनसिक धक्का आहे.
आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद होणं, डिवोर्सपर्यंत जाणं अशा घटना घडतात, मात्र पत्नीचा विरह सहन न झाल्याने 48 तासांत जीव सोडल्याच्या या घटनेनं संपूर्ण गाव हळहळलं. सात जन्म सोबत राहण्याचं वचन घेतलं, आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन घेतलं आणि ते वचन शेवटच्या क्षणी देखील पतीनं पूर्ण केलं. पत्नीपाठोपाठ दोन दिवसांत पतीनेही आपला जीव सोडला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
