यानंतर आता निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्याकडे शस्त्र असल्याचं देखील समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा शस्त्र परवाना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्याचं समोर आलं आहे. एका गुंडाच्या भावाला अशाप्रकारे शस्त्र परवाना दिल्याने महायुती सरकारवर टीका केली जात आहे. या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला असून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली आहे.
advertisement
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. योगेश कदम यांनी निलेश घायवळच्या भावाला दिलेल्या शस्त्र परवाना प्रकरणाची चौकशी एकनाथ शिंदे करतील असं गोगावले यांनी म्हटलं आहे. त्यांना योगेश कदमांनी जारी केलेल्या शस्त्रपरवान्याबद्दल विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
घायवळ शस्त्र परवान्याबद्दल विचारलं असता भरत गोगावले म्हणाले, "काल आम्ही याबाब बातम्यांमधून ऐकलं आहे. पण या सगळ्याची आम्हाला त्याची चौकशी करावी लागेल. मला त्याची पूर्ण माहिती नाही. राज्यमंत्र्यावर जो काही आरोप झाला आहे, त्याची आम्ही पुढील चौकशी करू किंवा एकनाथ शिंदे चौकशी करतील."
दरम्यान गोगावले यांनी नवी मुंबई येथील नवी विमानतळाच्या नामकरणाबाबतही प्रतिक्रिया केली. विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव द्यावे, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत याबाबत बैठका झाल्या. यातील अडथळे दूर करून दि बा पाटील यांचे नाव दिले जाईल. सरकार हे मान्य करेल.