मुंबई : पुण्यातील कुख्यात कुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्याच्या प्रकरणाने राज्यात राजकीय वादळ निर्माण केले आहे. या प्रकरणामुळे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी योगेश कदम यांना दोन ताटकळत बसावे लागल्याची माहिती समोर आली. यावेळी योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत घायवळ प्रकरणी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे कदम यांची राजकीय कोंडी झाली आहे. त्यांच्या बचावासाठी शिवसेना नेते आणि योगेश कदम यांचे वडील रामदास कदमदेखील पुढे सरसावले.
शुक्रवारी सकाळी योगेश कदम हे एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ‘मुक्तागिरी’ या बंगल्यावर गेले होते. मात्र, तेथे तब्बल दोन तास त्यांना प्रतिक्षा करावी लागली. शिंदे हे त्या वेळेत खालच्या दालनात न आल्याने कदम यांना ताटकळत बसावे लागले. गृहराज्यमंत्री असूनही मुख्यमंत्री भेटीसाठी तासन्तास वाट पाहण्याची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा झाली. घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्याने निर्माण झालेल्या या वादामुळे शिंदे गटातही अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून आले.
घायवळ प्रकरणावर एकनाथ शिंदेंनी काय म्हटले?
योगेश कदम यांनी ‘मुक्तागिरी’ या बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. शस्त्र परवाना प्रकरणात कोणतीही अनियमितता झाली नाही. नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मी पोलीस आयुक्तांना दिले होते,” अशी माहिती त्यांनी शिंदेंना दिली.
योगेश कदमांची बाजू ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, जर काही चुकीचं केलं नसेल, तर घाबरायचं कारण नाही. विरोधकांच्या टिकेला न जुमानता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा असा सल्लाही दिला.