मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम कांबळे याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये गेल्या काही काळापासून जवळीक निर्माण झाली होती. मात्र, या नात्याला मुलीच्या घरच्यांनी विरोध केला होता. त्यांनी वारंवार प्रीतमला धमक्या देत, समज देत या संबंधातून दूर राहण्याचा दबाव आणला होता. त्यामुळे प्रीतम मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता.
शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू
advertisement
सततच्या मानसिक ताणामुळे प्रीतमने २ ऑक्टोबर रोजी ग्रामोझोन हे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी तातडीने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले, मात्र विषारी द्रव्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरावर परिणाम झाला आणि अखेर शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एक प्रेमसंबंध स्वीकारला गेला नाही म्हणून एका तरुणाने आपले आयुष्य संपवणे ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. प्रीतमच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर, घरच्यांचा विरोध, समाजातील दबाव आणि मानसिक ताण यामुळे युवकांमध्ये वाढत चाललेली नैराश्याची भावना अधोरेखित झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.