गोंदिया : ताश पत्ते खेळत असताना झालेल्या क्षुल्लक वादातून अवघ्या दहा रुपयांसाठी कैचीने वार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गोंदियामध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे, खेळ सुरू असताना दोघांनी एकमेकांवर ब्लेड आणि कैचीने हल्ला केला होता. यात आरोपही जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील बाबाटोली परिसरात ही घटना घडली आहे. अरबाज अहमद शाह (२५) असं मृतकाचं नाव आहे. तर अलीफ खान असं आरोपीचं नाव आहे. मृतक आणि आरोपीचे दोघेही भटक्या समाजातील असून रेल्वे स्थानक परिसरामध्ये सध्या वास्तव्यास आहेत.
advertisement
(I Love You बोला आणि सुट्ट्या घ्या, शिक्षकाचे नको ते कारनामे, दुसरीतल्या मुलींची छेड!)
ताश पत्ते खेळत असताना दहा रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. मृतक अरबाज शाहने ब्लेडने अलिफ खानवर वार केले, यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावेळी अलिफ खानच्या हातात कैची लागली आणि त्याच्यावर हल्ला चढवला. सपासप वार केले. अरबाजला रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. पण जास्त प्रमाणात रक्त प्रवाह झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. अरबाजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सालेकसा पोलीस निरीक्षक भुषण बुराडे करीत आहेत.