धाराशिव: सध्याच्या काळात सरकारी नोकरीसाठी अनेक तरुण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकडे वळतात. परंतु, स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानंतर बऱ्याचदा तरुणांपुढे करियरचा मोठा प्रश्न निर्माण होतो. अनेक तरुण यामुळे नैराश्याचा शिकारही बनतात. परंतु, धाराशिवमधील नायकिंदे बंधूंनी एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय. भूम तालुक्यातील पाठसावंगीच्या बाळासाहेब आणि वैभ नायकिंदे यांनी स्पर्धा परीक्षेतील अपयशानंतर आधुनिक शेती सुरू केली. आता यातून ते वर्षाकाठी लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
पाठसावंगी येथील बाळासाहेब आणि वैभव नायकिंदे हे बंधू पदवीचं शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. सरकारी नोकरीचं स्वप्न होतं. परंतु, प्रयत्न करूनही ती मिळाली नाही, तेव्हा त्यांनी हार मानली नाही. थेट गाव गाठण्याचा निर्णय घेतला. घरची पिढीजात शेती होती. दोघे भाऊ शिक्षण घेत असल्याने आई-वडील शेती करत होते. पारंपरिक शेतीतून चांगला पैसाही मिळत नव्हता. त्यामुळे दोघांनी आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला.
आधुनिक शेतीतून लाखोंची कमाई
बाळासाहेबांनी शेतीची नस ओळखून आधुनिक शेती सुरू केली. पहिल्या वर्षी त्यांनी शिमला मिरचीची लागवड केली. त्यातून त्यांना 11 लाख रुपयांचे उत्पन्न आले. आज रोजी त्यांच्याकडे अडीच एकर पेरू व दोन एकर शिमला मिरची आहे. शिमला मिरचीच्या दोन तोड्यातून त्यांना 1 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर आणखी शिमला मिरचीतून त्यांना 10 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी पेरूतून 10 लाख रुपयांचा नफा शिल्लक राहिला होता. तर यावर्षी त्याहून दुप्पट नफा शिल्लक राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीये.
शिवभक्त शेतकरी! 50 लाखांचा बंगला बांधला, त्यावर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला!
अनेकांसाठी प्रेरणादायी
आई वडील पारंपारिक पिके करायचे. त्यातून फारसं उत्पन्न शिल्लक राहत नव्हतं म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या या तरुणांनी शेतीत अत्याधुनिक बदल केला. त्यामुळे शेतीतून त्यांची लाखोंची कमाई होतेय. आई वडिलांच्या मदतीने यशस्वी शेती करणाऱ्या नायकिंदे बंधूंची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.