सोलापूर : आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग करण्याची प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आता शेतीचं स्वरूप बदलत चाललं आहे. शेतकरी बांधव आता पारंपरिक शेतीच्या जोडीला फळं, भाज्या आणि फुलांच्या उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळवू लागले आहेत. तसंच शेतीपूरक व्यवसायांमधूनही चांगली कमाई करता येते. महत्त्वाचं म्हणजे आता शेतीचं उत्तम प्रशिक्षण घेऊन तरुण प्रगत शेतकरीही मोठ्या संख्येनं समोर येतात.
advertisement
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कुरूल येथे सदाशिव कांबळे आणि विजय कांबळे या काका-पुतण्यांनी रेशीम शेतीत मारलेली मजल खरोखर उल्लेखनीय आहे. मोहोळ आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये काही शेतकरी तुतीची लागवड करून यशस्वीरित्या रेशीम उत्पादन घेतात.
व्ही-1 या जातीची तुती कांबळेंना त्यांच्या नातेवाईकांनी उपलब्ध करून दिली. पूर्वी ऊसाची शेती करताना 1 एकर क्षेत्रात लागणाऱ्या पाण्यावर आता 3 एकर तुतीची शेती जोपासता येते, असं ते सांगतात. शिवाय एकदा लागवड केलेली तुती 15 वर्षे जगते. शिवाय त्यांनी लागवड केलेल्या तुतीचा पाला सहसा सुकत नाही आणि तो आकारानं मोठा असतो.
हेही वाचा : तब्बल अडीच लाखांचं अनुदान मिळू शकतं; शेतकऱ्यांनी 'इथं' करावा अर्ज
30 ते 40 दिवसांत हे उत्पादित रेशीम कर्नाटकच्या रामपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी नेलं जातं. प्रतिकिलो 400 ते 450 रुपयांचा भाव मिळतो. कर्नाटकात उत्पादित रेशीम नेण्यासाठी वाहतूक खर्च परवडण्याच्या अनुषंगानं मोहोळ परिसरातील 18 ते 20 रेशीम उत्पादक शेतकरी एकत्रितपणे सुमारे 1 टनापेक्षा जास्त रेशीम कर्नाटकात पाठवतात. त्यातून वाहतुकीसह इतर खर्च वगळून दरमहा 1 लाखापर्यंत उत्पन्न मिळतं.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कांबळे यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्या रेशीम उद्योगाची पाहणी केली. एकूणच, आपल्या उत्पादनाला चांगला भाव आणि त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असल्याचं कांबळे कुटुंबियांना समाधान वाटतं.