रोजच्या जेवणातल्या टोमॅटोच्या लागवडीतून होऊ शकता लखपती! शेतकऱ्यांनी दिल्या टिप्स
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
बाजारे कुटुंबीय गेल्या 23 वर्षांपासून अधूनमधून टोमॅटोचं उत्पादन घेत होते. त्यातून भरगोस उत्पन्न मिळू लागलं, मग त्यांनी दरवर्षी या पिकात वाढ केली. आज 13 एकर क्षेत्रावर त्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : अभ्यासपूर्ण शेती करा, असा सल्ला कृषीतज्ज्ञ शेतकऱ्यांना वारंवार देत असतात. त्यातूनच आता अनेक शेतकरी बांधव पारंपरिक शेतीसह पालेभाज्या, फळं आणि फूलझाडांमधून उत्तम उत्पन्न मिळवू लागले आहेत. आपल्या रोजच्या जेवणातल्या कांदा, बटाटा आणि टोमॅटोमधूनही लाखो रुपये कमवता येऊ शकतात, याचं उदाहरण अनेक शेतकरी आहेत. सातारचं बाजारे कुटुंबही यापैकीच एक.
advertisement
सातारच्या कराड तालुक्यातील उंब्रजजवळ असलेल्या शिवडे गावचे शेतकरी राहुल सुरेश बाजारे यांचे कुटुंबीय गेली 23 वर्षे आपल्या शेतात टोमॅटोचं उत्पादन घेतात. त्यांना भाजीपाला लागवडीची आवड आधीपासूनच होती. राहुल यांनी वाणिज्य शाखेतून पदवी पूर्ण होताच वडिलोपार्जित शेतीत काम करायला सुरूवात केली. महामार्गाच्या दोन्ही बाजूस पसरलेली अशी बाजारे कुटुंबाची एकूण साडेतेरा एकर बागायत शेती आहे.
advertisement
राहुल बाजारे यांचे वडील, चुलते गेली अनेक वर्षे पारंपरिक शेती करत होते. त्यात मधूनच वांगी, काकडी, कारली अशा विविध भाज्यांची कमी-अधिक प्रमाणात लागवड करायचे. त्यानंतर राहुल यांनी कोरोना काळात आपल्या शेतात विविध प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी अनेक प्रगतशील शेतकऱ्यांचे सल्ले घेतले, कृषीविषयक तज्ज्ञांचंही मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर जमिनीची सुपीकता सुधारून पिकाचं व्यवस्थित नियोजन करून उत्पन्नवाढीचा अभ्यास केला आणि मग पूर्ण तयारीनिशी या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.
advertisement
बाजारे कुटुंबीय गेल्या 23 वर्षांपासून अधूनमधून टोमॅटोचं उत्पादन घेत होते. त्यातून भरगोस उत्पन्न मिळू लागलं, मग त्यांनी दरवर्षी या पिकात वाढ केली. आज 13 एकर क्षेत्रावर त्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. वर्षातून ते 2 वेळा या लागवडीचं नियोजन करतात. त्यांनी एकरी 4300 रोपांची लागवड केली. शिवाय नियोजनानुसार प्रत्येक रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल, हवा खेळती राहील याची काळजी घेतली. त्यामुळे कीड, रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन फळांची संख्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे अत्यंत अभ्यासपूर्ण अशी ही लागवड केली आहे. त्यांनी यासाठी शेतीविषयक अभ्यासासह मार्केटचं नियोजन आणि वाढत्या मागणीचाही विचार केला होता. त्यामुळे ते वर्षातून 2 वेळा टोमॅटोची लागवड करतात. तसंच जमिनीची सुपीकता कमी झाल्यास उत्पादनही घटतं, म्हणून याचासुद्धा सखोल अभ्यास करून त्यांनी आधी जमिनीची सुपीकता वाढवली.
advertisement
अतिरिक्त रासायनिक घटकांच्या वापरातून आपल्या जमिनीचं आरोग्य खराब होत असल्याचं लॉकडाऊन काळात त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी आपल्या शेतात दहा ड्रम तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. आता टोमॅटोचं एकरी सरासरी 40 टनापर्यंत उत्पादन मिळेल, असा त्यांना अंदाज आहे. महत्त्वाचं म्हणजे सध्या टोमॅटोला 20 ते 40 रुपये प्रति किलोचा बाजार भाव मिळत असल्यानं सरासरी खर्च वगळून लाखो रुपये उत्पन्न मिळेल असंही त्यांना अपेक्षित आहे.
advertisement
इतर शेतकऱ्यांना आवाहन!
सेंद्रिय घटकांचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहतेच, शिवाय रासायनिक खतांचा खर्चही कमी होतो. मी सेंद्रिय घटकांचा वापर करून प्रगतशील शेती करत आहे, तुम्हीसुद्धा करा, असं आवाहन राहुल बाजारे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
June 27, 2024 1:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
रोजच्या जेवणातल्या टोमॅटोच्या लागवडीतून होऊ शकता लखपती! शेतकऱ्यांनी दिल्या टिप्स