सातारा : जिल्ह्यातील फलटण तालुका हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु याच दुष्काळी पट्ट्यातलं धुमाळवाडी हे गाव संपूर्ण राज्यात फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या शेतकरी बांधवांनी दुष्काळावर मात करून पारंपरिक शेतीच्या पलिकडं जाऊन आपल्या शेतात फळबागा फुलवल्या आहेत. गावात जवळपास 19 हून अधिक फळबागा आहेत, म्हणूनच उंच उंच डोंगरांमध्ये वसलेल्या या धुमाळवाडी गावाला फळांचं गाव म्हणून ओळखलं जातं.
advertisement
धुमाळवाडीतल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या फळांची लागवड आपल्या बागेत केली आहे. इथं अगदी तैवान पिंक पेरू, डाळिंब, सिताफळ, रामफळ, केळी, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, द्राक्ष, चिकू आणि संत्र्यांसह विविध फळांचा घमघमाट असतो. याच धुमाळवाडीतील प्रगतशील शेतकरी दत्तात्रेय धुमाळ यांनी आपल्या सव्वा एकर क्षेत्रात आवळ्याची लागवड केली आहे, त्यातून त्यांना लाखो रुपयांचं वार्षिक उत्पन्न मिळतं.
हेही वाचा : लाडक्या म्हशीचं हुबेहूब चित्र काढलं, पण दुर्देवानं तिलाच नाही ते पाहता आलं!
खरंतर धुमाळ कुटुंबाला पिढ्यान् पिढ्या शेती आणि फळ लागवडीचा वारसा लाभला आहे. त्यांनी आपल्या शेतजमिनीत अनेक फळबागांची लागवड केली. दत्तात्रेय धुमाळ यांच्या वडिलांनी आवळ्याची लागवड करायला सुरुवात केली होती. तर दत्तात्रेय यांनी आधुनिकतेची कास धरून सेंद्रिय आवळ्याची शेती हा एक नवा पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा केला.
आवळा हे कोरडवाहू पीक असल्यामुळे धुमाळ कुटुंबियांनी त्याचं उत्पादन घ्यायचं ठरवलं. आपल्या सव्वा एकर क्षेत्रात त्यांनी आवळ्याच्या झाडांची लागवड केली. दत्तात्रेय यांच्या वडिलांनी 10 वर्षांपूर्वी लावलेल्या आवळ्याच्या झाडांपासून आता शेकडो किलो आवळे मिळतात. त्यातून त्यांची लाखो रुपयांची कमाई होते. पिता-पुत्र मिळून आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीच्या शेकडोहून अधिक आवळ्याच्या झाडांचं संगोपन करतात. यापैकी एका झाडापासून 100 ते 110 किलो आवळ्याचं उत्पादन मिळतं. या आवळ्याची विक्री महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येदेखील केली जाते. शिवाय परराज्यातील व्यापारी धुमाळवाडीत आल्यानंतर शेताच्या बांध्यावरूनही आवळा खरेदी करतात. यातून आवळ्याला प्रति किलो 50 ते 60 रुपयांचा दर मिळत असल्याचं दत्तात्रेय धुमाळ यांनी सांगितलं.
दत्तात्रेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आवळ्याच्या झाडाचा हंगाम वर्षातून दोनदा घेतात. एका हंगामात सरासरी आवळ्याच्या विक्रीतून 3 ते 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. असे वर्षाच्या 2 हंगामात खर्च वगळून साधारण 6 ते 7 लाख रुपये एवढा नफा मिळतो. त्यामुळे आवळ्याच्या उत्पादनातून हे कुटुंब अत्यंत सुख-समाधानाचं आयुष्य जगत आहे.





