जालना : वातावरणातील बदल, प्रदूषित हवामान आणि बाजारभावाचं गणित हातात नसणं यामुळे शेतकऱ्यांपुढे नेहमीच वेगवेगळी आव्हानं उभी राहतात. त्यामुळे शेती करणं हल्ली अवघड होत चाललंय. मात्र, अनेक प्रगतशील शेतकरी यावर मात करण्यासाठी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करतात. जालना जिल्ह्यातील साळेगावच्या विठ्ठल डिखुळे या शेतकऱ्यानं तर आपल्या शेतात एक वेगळाच प्रयोग केलाय.
advertisement
विठ्ठल यांनी 1 एकरात ड्रॅगन फ्रूटचं यशस्वी उत्पादन घेतलंय. विशेष म्हणजे यातून त्यांना चांगला नफादेखील मिळतोय. मागील वर्षी त्यांना या शेतीतून तब्बल 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. तर, यंदा 7 ते साडेसात लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. जाणून घेऊया त्यांच्या या यशस्वी शेतीबाबत.
हेही वाचा : खरीप दुष्काळी अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन
अल्पभूधारक शेतकरी असल्यानं विठ्ठल हे नेहमीच दुष्काळ आणि विविध संकटांनी त्रासलेले असायचे. एके दिवशी मित्रांसोबत ते महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा त्यांनी खडकाळ माळरानावर ड्रॅगन फ्रूटची बहारदार शेती पाहिली. तेव्हाच या उत्पादनाबाबत त्यांच्या मनात कुतुहूल निर्माण झालं. आपणही हे उत्पादन घ्यायचंच असं त्यांनी ठरवलं.
त्यानंतर जालना जिल्ह्यातीलच एका शेतकऱ्याकडून त्यांनी ड्रॅगन फ्रूटची रोपं घेतली. 2020 साली त्यांनी आपल्या 1 एकर जागेत 8 बाय 11 या अंतरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. तिसऱ्याच वर्षी ड्रॅगन फ्रूटच्या झाडांना उत्तम फळधारणा झाली. 2023 मध्ये त्यांनी 5 लाखांचं निव्वळ उत्पन्न ड्रॅगन फ्रूटच्या विक्रीतून मिळवलं. विशेष म्हणजे त्यांनी या फळांची स्वतः विक्री केली. बाजारात या फळांना 120 रुपये ते 150 रुपये प्रतिकिलो एवढा दर मिळाला. यंदादेखील त्यांच्या बागेतील ड्रॅगन फ्रूटच्या झाडावर मोठ्या प्रमाणावर फळं आली आहेत. त्यामुळे यातून त्यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
हेही वाचा : 'इथं' शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळतील सोयाबीन बियाणं! कुठं करावा अर्ज?
या शेतीसाठी सुरूवातीला जवळपास 3 लाख रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर मात्र विशेष खर्चाची आवश्यकता नसते. शेणखत, ताक आणि गोमुत्राची फवारणी करणं एवढी मात्र झाडांची वेळच्या वेळी निगा राखावी लागते. बाकी कोणतंही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता एका झाडावर साधारणतः 15 ते 16 किलो ड्रॅगन फ्रूट येऊ शकतात, असं शेतकरी विठ्ठल डिखुळे यांनी सांगितलं.