कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हा एक सधन ऊस उत्पादन जिल्हा आहे. त्यामुळे येथील शेतकरी ऊस उत्पादनाकडे जास्त वेगळ्या नजरेतून पाहत नाहीत. पण तरीही कोल्हापुरातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या शेतात उसाच्या लागवडीत विक्रमी उत्पन्न मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उदय पाटील यांनी 18 गुंठे शेतीत तब्बल 57 टन उसाचे उत्पादन घेऊन सर्व शेतकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे.
advertisement
पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे उदय पाटील यांचे शेत आहे. गेली 15 ते 20 वर्षे शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करत त्यांनी आजच्या तरुण शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. या युवा शेतकऱ्याने एका गुंठ्याला तब्बल 3 टनापेक्षा अधिक असे 18 गुंठ्यात तब्बल 57 टन 86032 या उसाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. तर भुईमूग, मिरची, मेथी अशी आंतरपिके घेऊन त्यांनी त्यातूनही सव्वा लाख रुपये मिळवले आहेत.
मुक्या जीवांना जीवन, कोल्हापूरकरांनी उभारले कृत्रिम पाणवठे, Video
प्रयोगशील शेतकरी
उदय पाटील यांना मिळालेल्या उत्पन्नापैकी जवळपास 50 हजार रुपये खर्च वगळला तर 18 गुंठ्यात एकूण सुमारे अडीच लाख रुपये इतका निव्वळ नफा मिळाला आहे. याआधी त्यांनी भातपीक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. तर पॉलिहाऊस शेतीमध्ये जरबेरा फुलांची शेती देखील त्यांनी केली आहे. याचाच अनुभव घेत त्यांनी आपल्या 18 गुंठे शेतात उसाचे उत्तम पीक घेतले आहे.
कशी केली शेती?
उदय यांनी सुरवातीला आपल्या शेतात 10 ट्रॉली शेणखत घालून नांगरट करून उतारास चार फूटाची सरी काढली होती. यामध्येच भुईमूग आणि मिरची अशी आंतरपिके त्यांनी लावली होती. त्यानंतर 30 ऑगस्ट 2022 रोजी उदय यांनी उसाची एकडोळा पध्दतीने साधरण दीड फूटांवर लागवड केली होती. आपल्या शेतात त्यांनी ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा केला होता. तर असा नॅनोटेक, हायटेक, वीटाजाईम या आळवण्या त्यांनी दिल्या होत्या. तर बायोजाईम ग्रॅन्युअल्सही दिले होते. भुईमुगानंतर त्यांनी मेथीचे पीक घेतले होते.
थांब की भावा.., नवीन वर्षात कोल्हापूरच्या लेकी उतरल्या रस्त्यावर, Video
खत, औषध आणि योग्य नियोजन
शेती करताना त्यांनी एफको, महाधन, जयकिसान, युरीया अशा खतांचा आणि औषधांचा वापर केला. ऊस वाढीच्या कालावधीत त्यांनी शेतात तणनाशकाचा वापर केला नाही. त्या ऐवजी वारंवार शेतात त्यांनी पॉवर ट्रेलर ने नांगरट करून भांगलन केली होती. त्यामुळेच 18 गुंठ्यात तब्बल 30 फूट लांब अशा जवळपास 45 ते 50 पेर असणाऱ्या उसाचे उत्पादन त्यांनी घेतले आहे.
दरम्यान, सध्या नवयुवकांना नोकरीतून पैसे कमावण्यात रस असताना शेतीमध्येही कष्ट करून योग्य नियोजनाद्वारे शेती केल्यास चांगला फायदा मिळवता येतो, हे दाखवून उदय पाटील यांनी युवकांसमोर आदर्शच घालून दिला आहे.