थांब की भावा.., नवीन वर्षात कोल्हापूरच्या लेकी उतरल्या रस्त्यावर, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोल्हापूरच्या ड्रीम टीमने वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : आपल्याकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन हा नित्याचा प्रकार बनला आहे. कोल्हापूरचे वाहनचालकही त्याला अपवाद नाहीत. कित्येक वेळा वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात देखील घडतात. अशातच कोल्हापूरच्या काही लेकी पुढे आल्या आहेत. 2024 या नववर्षाच्या सुरुवातीलाच "मी जबाबदार कोल्हापूरकर" ही मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. कोल्हापूर शहरातील वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व या मोहिमेच्या माध्यमातून पटवून देण्यात आले आहे.
advertisement
कोल्हापुरातील 4 महाविद्यालयीन विद्यार्थिंनींनी कोरोना काळात समाजहीत जपत कोल्हापूरच्या सामान्य जनतेसाठी कार्य करण्यास सुरुवात केली होती. श्रुती चौगुले, श्रेया चौगुले, नेहा पाटील, अर्पिता राऊत अशा चौघींनी मिळून त्यांच्या ग्रुपला ड्रीम टीम फाउंडेशन असे नाव दिले. पुढे या फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी कोल्हापूरसाठी सामाजिक कार्य सुरूच ठेवले. ज्या गोष्टी शासनाने करायला हव्यात त्या स्वखर्चातून त्यांनी जनतेसाठी केल्या आहेत. त्यातच आता कोल्हापूरकरांमध्ये वाहतूक नियमांबाबतीत प्रबोधन करण्याच्या दृष्टीने त्यांनी "मी जबाबदार कोल्हापूरकर" ही मोहीम सुरू केली आहे.
advertisement
काय आहे ही मोहीम?
या मोहिमेसाठी कोल्हापूर शहरातील सीपीआर चौक या ठिकाणच्या सिग्नलवर या ड्रीम टीम फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी जनतेमध्ये वाहतूक नियमांसाठी प्रबोधन केले. ड्रीम टीमच्या 30 स्वयंसेवकांनी हातात अस्सल कोल्हापुरी रांगड्या भाषेतील वाहतूक नियमांबाबत सांगणारे फलक धरले होते. "थांब की भावा, पडू दे की सिग्नल हिरवा.. खाली बघा की राव इथं झेब्रा क्रॉसिंग हाय.. रुग्णवाहितीसाठी नेहमी डावी बाजू रिकामी ठेवा.. असे फलक वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच यावेळी हेल्मेट घातलेल्या दुचाकी वाहनधारकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागतही करण्यात आले. तर यापुढे दर महिन्यातून एकदा तरी अशाच प्रकारे प्रबोधन करण्याचा संकल्प ड्रिम टीम या फाउंडेशनची सदस्य असलेल्या श्रुती चौगुले हिने सांगितले आहे.
advertisement
कोल्हापुरात अशा मोहिमेची गरज
खरंतर कोल्हापूर शहरातील खड्ड्यांमुळे कोल्हापूरची खड्डेपूर अशी ओळख बनत असताना कित्येक बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतुकीची समस्या वाढतच चालली आहे. कित्येकदा सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर किंवा त्याहीपुढे वाहने उभी केली जातात. तर काहीजण तर डाव्या बाजूच्या लेनमध्ये वाहन उभे करतात. ज्यामुळे अँबुलन्ससारख्या वाहनांनाही अडथळे निर्माण होतात. तसेच सिग्नल हिरवा होण्याच्या 10 सेकंद आधीच पुढे पुढे जाणे, हे असले प्रकार तर कोल्हापुरात सर्रास होऊ लागले आहेत. अशामुळे अपघात होऊ शकतो, एखाद्याचा जीवही जावू शकतो. त्याचबरोबर सिग्नल असलेले चौकात विनाकारण हॉर्न वाजवल्याने ध्वनि प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. अशा वाहतूक नियमांबाबतीत सर्वच समस्यांवर उपाय म्हणून ड्रीम टीमने ही "मी जबाबदार कोल्हापूरकर" अशी मोहीम हाती घेतली आहे.
advertisement
या आधीचे ड्रीम टीमचे कार्य..
कोरोना काळात सुरू झालेली ड्रीम टीम फाउंडेशन ही त्यानंतरही समाजासाठी विविध उपक्रम राबवत आली आहे. यामध्ये सुरुवातीलाच कोरोना कालावधीत त्यांनी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतःच्या पैशातून 65 दिवस मोफत नाश्ता पुरवला होता. त्यानंतर थोडे पैसे साठवून त्यांनी याच रुग्णालयाच्या परिसरात सध्या फिल्टर पाण्याचे आणि गरम पाण्याचे वॉटर एटीएम सुरू केले होते.
advertisement
स्वत:साठी मिळालेल्या पॉकेट मनीतून कोल्हापुरात रस्ता 90 अंशात वळणाऱ्या काही ठिकाणी कॉन्वेक्स मिरर त्यांनी बसवले होते. तर दिवाळीत पर्यावरण प्रबोधन करत बाजारपेठेत ग्राहकांच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये त्यांना कापडी पिशव्या पुरवल्या होत्या. असे एक ना अनेक उपक्रम जोडल्या गेलेल्या सुमारे 100 हून अधिक स्वयंसेवकांमार्फत या ड्रीम टीम फाऊंडेशनने राबवले आहेत.
दरम्यान, ड्रीम टीम फाउंडेशन आणि कोल्हापूरच्या मुली-महिलांनी राबवण्यास सुरु केलेल्या 'मी जबाबदार कोल्हापूरकर' मोहीमेमुळे कोल्हापुरात वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमाबाबत थोडी तरी समज येईल अशी आशा आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
January 02, 2024 11:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
थांब की भावा.., नवीन वर्षात कोल्हापूरच्या लेकी उतरल्या रस्त्यावर, Video