जालना : मूग म्हणजे पचायला हलका आणि झटपट होणारा पौष्टिक पदार्थ. शेतकऱ्यांसाठी हे खरीप हंगामातलं प्रमुख पीक. डाळवर्गीय पीक असल्यानं मुगाला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. यंदा मान्सूनचं आगमन वेळेत झाल्यानं मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे बाजार समितीत आवकही मुबलक होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली होती. त्यानुसार जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या मुगाची चांगली आवक सुरू झालीये.
advertisement
यंदा जूनमध्येच पावसाला सुरूवात झाल्यानं मूग आणि उडीद या दोन्ही पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली. परिणामी उत्पादन आणि उत्पन्नही तसंच चांगलं मिळण्याची आशा होती. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मूग पिकाची आवक 100 ते 150 क्विंटलच्या आसपास आहे, जी येत्या काळात आणखी वाढून 400 ते 500 क्विंटलपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
महत्त्वाचं म्हणजे यंदा आवक मोठी असली तरी सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे बऱ्याच मुगांची गुणवत्ता ढासळली आहे, परिणामी दरात मोठी तफावत दिसून येतेय. दरवर्षी 10,000 रुपयांपर्यंत भाव मिळणारे मूग यंदा साडेसहा ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल दरात असल्यानं शेतकरी, व्यापारी चिंतेत आहेत. सध्या चांगल्या दर्जाच्या मुगाला 7,500 रुपयांपर्यंत दर मिळतोय, तर साधारण गुणवत्तेच्या मुगाला 6,500 ते 7,300 रुपयांच्या आसपास भाव आहे.
दरम्यान, आता सणवार सुरू झाले आहेत. दिवाळीत मूग आणि इतर धान्य आवर्जून खरेदी केले जातात. याचा मुगाच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तम क्वालिटीच्या मुगाचा भाव 8000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता व्यापारी संजय कानडे यांनी वर्तविली आहे.