कर्नाटकमधील चिकमंगळूर जिल्ह्यातील हुल्लेहल्ली गावचे रहिवासी रमेश (वय : 45 वर्षे) यांनी आपल्या 8 एकर जमिनीत डाळिंबाची लागवड केलीये. यासाठी त्यांनी 20 लाख रुपये खर्च केले. ही जेवढी बलाढ्य गुंतवणूक आहे तेवढंच बक्कळ उत्पन्न त्यांना या शेतीतून मिळतंय.
आपल्या शेतातल्या डाळिंब विक्रीतून रमेश यांची कमाई होते तब्बल 95 लाख रुपयांची. ज्यातून ते आज कोट्याधीश झाले आहेत. अर्थात यामागे त्यांची मेहनतही मोठी आहे. महत्त्वाचं म्हणजे हुल्लेहल्लीचे गावकरी साल 2023पासून दुष्काळाचा सामना करताहेत. अशात रमेश यांनी गावात जणू सोनंच पिकवलंय.
advertisement
रमेश यांनी पहिल्यांदाच दुष्काळात डाळिंबाची लागवड केली आणि पहिल्याच प्रयत्नात एवढं चांगलं उत्पन्न मिळवलं. त्यांनी आतापर्यंत आपल्या शेतात 2400 रोपांची लागवड केली. हुल्लेहल्ली गावातील शेतकरी सांगतात, तामिळनाडू, बंगळुरू, चेन्नई, महाराष्ट्र, श्रीलंका आणि बांगलादेशात कर्नाटकातून कॉफी आणि डाळिंबाची निर्यात होते. रमेश यांच्या शेतातील डाळिंबाची विक्री 160 रुपये किलो दरानं होते. हुल्लेहल्ली आणि आजूबाजूच्या गावांमध्ये फार कमी शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड केलीये, मात्र रमेश यांच्यासारखा फायदा कोणालाच झालेला नाही.
आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठ्या डाळिंब उत्पादक देशांपैकी एक आहे. मातीची गुणवत्ता, हवामान, लागवड पद्धती, बाजारपेठेतील मागणी इत्यादींवर डाळिंब शेतीचा नफा अवलंबून आहे. मात्र डाळिंबाच्या झाडांना फार जपावं लागत नाही. या झाडांना भरपूर पाणीही द्यावं लागत नाही. शिवाय इतर झाडांच्या तुलनेत या झाडाला जास्त फळं येतात. महत्त्वाचं म्हणजे पाणी कमी लागत असल्यानं या झाडांची लागवड कमी जलसाठा असलेल्या भागातही करता येते.
दरम्यान, डाळिंब हे आरोग्यपयोगी आणि लोकप्रिय फळ आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारपेठांमध्ये या फळाला उत्तम मागणी असते. त्यात हे फळ लवकर खराब होत नाही. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. परिणामी डाळिंब उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळतं. हेच शेतकरी रमेश यांनी करून दाखवलंय.