2 भावांनी ओसाड जमिनीवर पिकवलं सोनं; आज दारात 5 गाड्या, कमाई 30 लाखांची!
- Reported by:Shubham Sharad Bodake
- local18
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
Agriculture business : ज्या जमिनीवर जनावरांना चरण्यासाठी दूरदूरपर्यंत झुडूपं नव्हती, त्या जमिनीवर त्यांनी नंदनवन फुलवण्याची किमया केली.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : आता अनेक शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि फुलबागेतून चांगलं उत्पन्न कमवतात. भाज्या, फळं, फुलांना बाजारात दररोज मागणी असल्यानं त्यातून बक्कळ कमाई होते. 2 शेतकरी भाऊ तर या लागवडीतून चक्क 4-5 गाड्यांचे मालक झाले आहेत. अर्थात यामागे त्यांची मेहनतही तितकीच आहे. आई-वडील गेल्यानंतर घरची जबाबदारी खांद्यावर घेऊन हे भाऊ शेतकरी झाले आणि त्यांनी जमिनीतून जणू सोनं उगवलं.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे या शेतकऱ्यांनी एका पडक्या माळरानावर उत्तम शेती केलीये. आज त्यांचं उत्पन्न आहे लाखो रुपये. ही यशोगाथा आहे सातारच्या कोरेगाव तालुक्यातील साप गावचे रहिवासी असलेल्या जाधव बंधूंची. त्यांच्या या मेहनतीचं आजूबाजूच्या गावांमध्येही कौतुक होतं.
कल्याण आणि विजय असं या भावांचं नाव. 2006 साली त्यांच्या आई-वडिलांचं निधन झालं. मग जाधव बंधूंनी घरची जबाबदारी स्वीकारून बँकेतून कर्ज घेतलं आणि माळरान पोखरलं. मात्र पाणी कुठून आणायचं हा मोठा प्रश्न होता. त्यावर मात करत त्यांनी 3 किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन काढून आपल्या माळरानावर पाणी आणलं आणि शेतीला सुरूवात झाली. अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी हार मानली नाही. शेतात वेगवेगळे प्रयोग केले आणि ऊसाचं उत्पादन घेतलं. पाठोपाठ आल्याचंही उत्पादन घेतलं. त्यानंतर भाजीपाला शेतीला सुरूवात केली. हळूहळू त्यांना चांगलं उत्पन्न मिळत गेलं.
advertisement
ज्या जमिनीवर जनावरांना चरण्यासाठी दूरदूरपर्यंत झुडूपं नव्हती, त्या जमिनीवर त्यांनी नंदनवन फुलवण्याची किमया केली. नापीक जमिनीला सुपीक करण्यासाठी अर्धा किलोमीटर लांब जाऊन पाणी आणलं. या अंतरात सावली मिळवायला एखादं झाडही नव्हतं. अशा या रानावर आज त्यांनी 40 आंब्याची, 20 नारळाची, चिकू, सफरचंद, अंजीर, सिताफळ, इत्यादी अनेक झाडांची लागवड करून बाग फुलवली आहे. त्यांनी फळांसह अनेक फुलं, पालेभाज्या, ऊस, सोयाबीन, आलं, टोमॅटो, इत्यादी विविध पिकांची लागवड केली.
advertisement
या शेतीच्या जोरावरच दोन्ही भावंडांची लग्न झाली आणि दोघांचे संसारही सुरू झाले. या शेतीसाठी त्यांना मित्रांची आणि बहिणीची मोलाची साथ मिळाली. महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी या 2 भावंडांकडे सायकल नव्हती, आज ते स्कॉर्पिओ, बुलेटसह 4-5 गाड्यांचे मालक आहेत. खडकाळ माळरानावर केलेल्या शेतीतून आज त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे 25 ते 30 लाख रुपये. आज ते सुखी आयुष्य जगत आहेत. विजय संभाजी जाधव यांनी याबाबत माहिती दिली.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Aug 20, 2024 7:51 PM IST







