सोलापूर : कधी पावसाची कमतरता, कधी उन्हात पाऊस अशा विविध अडचणींवर मात करत शेतकरी राजा उत्तम पिक घेण्यासाठी तळमळत असतो. सरकारकडूनही शेतकऱ्यांना मदत म्हणून विविध योजना राबवल्या जातात. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधणाऱ्यांना 2 लाख 50 हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी 50 हजार रुपये, इनवेल बोअरिंगसाठी 20 हजार रुपये, तर ज्या शेतकऱ्यांची जुनी विहीर आहे त्यांना विद्युत जोडणीसाठी 10 हजार रुपये, शेततळ्याचं प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख रुपये, ठिबक सिंचन संचासाठी 50 हजार रुपये देण्याची तरतूद यात आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा जास्त नसावं ही अट आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांना मिळते 60 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान, पण कशासाठी?, काय आहे पोकरा योजना?, सविस्तर माहिती..
दरम्यान, सिंचन विहिरीसाठी 4 लाखांचं अर्थसहाय्य मिळतं आणि त्यासाठी उत्पन्नाची अट नाही. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यावर लॉटरी पद्धतीनं लाभार्थींची निवड होते. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी (विशेष घटक) नंदकुमार पाचकुडवे यांनी केलं आहे.
आवश्यक कागदपत्र :
- शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा
- 6 व उतारा (फेरफार)
- सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेलं जात प्रमाणपत्र
- तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड छायांकित प्रत
- बँक पासबुक छायांकित प्रत