धाराशिव : पावसामुळे शेतकरी राजा सुखावलाय. पिकांना भरपूर पाणी मिळाल्यानं आनंद आहे. परंतु काही पिकांना कीड लागायला सुरूवात झालीये. त्यामुळे चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर यावर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे.
धाराशिव जिल्ह्यात मागील 15 ते 20 दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे खरीप हंगामातील वाढीस लागलेल्या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतोय. जिल्ह्यात लाखो हेक्टरवर सोयाबीनचं पीक घेतलं जातं. अशात आता सोयाबीनच्या कोवळ्या पानांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय. त्यात खोडमाशी, चक्रीभुंगा, उंट अळी, हिरवी करडी अळी, तपकिरी उंटाळी, तंबाखूवरील अळी, लष्करी अळी, काटेरी, इत्यादी अळ्यांचा समावेश आहे.
advertisement
हेही वाचा : सोयाबीनची पानं रोप अवस्थेतच पडली पिवळी? हा आहे 'क्लोरोसिस'
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पिकं पिवळी पडतात, मग मशागतीस वाव मिळत नाही. मात्र काळजी नसावी, सोयाबीनला लागणाऱ्या किडीवर खुद्द कृषी अधिकाऱ्यांनी उपाय सांगितले आहेत.
सोयाबीन पिकावरील पानं खाणाऱ्या स्पोडेप्टेरा उंट अळी, केसाळ अळी, घाटे अळी, इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी क्वीनालफॉस 25% ईसी 20 मिली किंवा लॅम्बडा साहल्योथ्रीन 4.9% किंवा क्लोरान्ट्रीनीलीप्रोल 18.5% 3 मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तसंच चक्रीभुंगा किंवा खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी डायमोथेएट 30% ईसी किंवा क्वीनालफॉस 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी, असं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असं आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केलं आहे.