मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रमुख भागांपैकी एक असलेल्या नरिमन पॉइंटमध्ये 4.61 एकर जमीन खरेदी केली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) कडून 3,472 कोटी रुपयांना ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. ज्याला या वर्षातील सर्वात मोठी जमीन खरेदी मानले जात आहे. ही जागा मंत्रालय, बॉम्बे हायकोर्ट आणि अनेक मोठ्या कंपन्यांच्या मुख्यालयाच्या जवळ असल्यामुळे तिचे महत्त्व अधिक वाढले आहे.
advertisement
गेल्या वर्षी MMRCL ने ही जमीन विकण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. नरिमन पॉइंटमध्ये प्रथमच कोणतीही जमीन लिलावासाठी ठेवली जात होती. मात्र या वर्षी जानेवारीमध्ये रिझर्व्ह बँकेने आपल्या मुख्यालयाच्या विस्तारासाठी ही जमीन खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले. त्यानंतर MMRCL ने निविदा रद्द करून RBI च्या प्रस्तावावर सहमती दर्शवली.
5 सप्टेंबर रोजी हा व्यवहार अधिकृतपणे नोंदणीकृत झाला असून त्यासाठी 208 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. हा व्यवहार RBI साठी खूप महत्त्वाचा आहे. कारण यामुळे मुंबईतील तिच्या मालमत्तेत मोठी वाढ होईल. RBI चे मुख्यालय आधीच मिंट रोडवर आहे आणि अनेक महत्त्वाच्या इमारती तिथे आहेत. आता या नवीन जमिनीवर भविष्यात संस्थात्मक विकास केला जाईल. जेणेकरून देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये रिझर्व्ह बँकेची उपस्थिती आणखी मजबूत होईल.
मुंबईत मेट्रो प्रकल्पांचे नियोजन आणि बांधकाम करणाऱ्या MMRCL ने आपल्याकडील जमिनीचा योग्य वापर करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या करारामुळे मेट्रो विस्तारासाठी निधी उभारण्यास मदत होणार आहे.
रिअल इस्टेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की- या व्यवहारामुळे हे सिद्ध होते की बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि लोअर परळसारखी नवीन व्यावसायिक केंद्रे वाढत असली तरी नरिमन पॉइंटमधील जमीन आजही खूप महागडी आणि मागणीत आहे.