मुंबई: केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी GSTच्या दरात बदल केले. यामुळे अनेक वस्तू स्वस्त: होणार आहेत. अशाच जर तुम्हाला वाटत असेल की येत्या काळात दुधाचे दर कमी होतील, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने अल्ट्रा-हाय टेम्परेचर (UHT) दुधावरील वस्तू आणि सेवा कर (GST) 5% वरून 0% केला आहे. हा बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. याचा अर्थ केवळ UHT दुधाच्या किमती कमी होतील. पॅकेटमधील ताज्या दुधावर आधीपासूनच कोणताही GST नव्हता, त्यामुळे त्याच्या दरात कोणताही बदल होणार नाही. काही माध्यमांनी दूध 3-4 रुपयांनी स्वस्त होईल, असे वृत्त दिले होते; पण ही माहिती खरी नाही.
advertisement
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की- ताज्या पॅकेटमधील दुधाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कारण त्यावर आधीपासूनच जीएसटी शून्य होता. त्यामुळे तुम्ही रोज खरेदी करत असलेल्या दुधाच्या पॅकेटची किंमत आहे तशीच राहील. फक्त जे लोक UHT दूध खरेदी करतात, त्यांना थोडा दिलासा मिळेल.
काय आहे UHT दूध
अल्ट्रा-हाय टेम्परेचर (UHT) दूध आणि सामान्य पॅकेटमधील दूध अनेक बाबतीत वेगळे असते. त्यांना गरम करण्याची पद्धत, त्यांची ‘शेल्फ लाइफ’ (टिकण्याचा कालावधी), साठवण्याची पद्धत आणि चव यात फरक असतो. UHT दुधावर प्रक्रिया करताना ते खूप जास्त तापमानावर गरम केले जाते. ते सुमारे 135-140 अंश सेल्सिअस तापमानावर फक्त 2-5 सेकंदांसाठी उकळले जाते. यामुळे दुधातील जवळपास सर्व जीवाणू आणि सूक्ष्मजंतू नष्ट होतात, ज्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित होते.
दुसरीकडे सामान्य पॅकेटमधील दूध 72 अंश सेल्सिअस तापमानावर 15 सेकंदांसाठी गरम केले जाते (याला पाश्चराइजेशन म्हणतात). यामुळे फक्त हानिकारक जीवाणू नष्ट होतात, तर काही सूक्ष्मजीव शिल्लक राहतात.
UHT दूध खास प्रकारच्या सीलबंद पॅकिंगमध्ये येते. पॅक उघडल्याशिवाय त्याला फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते आणि ते अनेक महिने सुरक्षित राहू शकते. सामान्य पॅकेटमधील दूध नेहमी फ्रिजमध्ये ठेवावे लागते आणि ते जास्त दिवस टिकत नाही.
दोघांच्या चवीतही थोडा फरक असतो. UHT दुधात थोडा ‘शिजलेला’ वास येऊ शकतो, तर सामान्य दुधाची चव ताजी असते. पोषण मूल्यांबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही जवळपास समान असतात. फक्त UHT प्रक्रियेत काही जीवनसत्त्वे (उदा. फोलेट) थोडे कमी होऊ शकतात आणि प्रथिनांच्या रचनेत हलका बदल होऊ शकतो.
UHT दुधाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते जास्त काळ टिकते आणि फ्रिजशिवायही सुरक्षित राहते. सामान्य पॅकेटमधील दूध लवकर खराब होऊ शकते. या दोन्ही प्रकारच्या दुधात कोणतेही रसायन मिसळले जात नाही. UHT दुधाचा जास्त कालावधी केवळ जास्त तापमानावर गरम करण्याची प्रक्रिया आणि विशेष पॅकिंगमुळे असतो.