सण आणि लग्नसोहळ्यांमध्ये मागणी वाढणार
भारतात सण आणि लग्नसोहळ्यांचा हंगाम जवळ आल्याने सोने-चांदीच्या मागणीसंदर्भात बाजारात हालचाल वाढली आहे. मात्र आता गुंतवणूकदारांचे खरे लक्ष जॅक्सन हॉलमधील महत्त्वाच्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे विधान जगभरातील बाजारांची दिशा निश्चित करू शकते. तज्ज्ञांनुसार, ही बैठक खूप संवेदनशील ठरू शकते. याचे कारण असे की- अमेरिकेतील रोजगाराचे आकडे कमकूवत दिसत आहेत. पण महागाई अजूनही 2.5 ते 3 टक्क्यांच्या मर्यादेत अडकलेली आहे. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व्हवर दुहेरी दबाव आहे. एका बाजूला बेरोजगारी वाढू न देणे आणि दुसऱ्या बाजूला महागाईवर नियंत्रण ठेवणे.
advertisement
सोने आणि चांदीच्या किमतींवर परिणाम
सोने: गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव सुमारे 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तो आता वाढून 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. याचा अर्थ विवाहसोहळ्यांसाठी बजेट असलेल्या खरेदीदारांना आता तेवढ्याच पैशांत 30-40 टक्के कमी सोने मिळत आहे. भारतात सोन्याची मागणी आणि आयातही गेल्या काही महिन्यांत कमी झाली आहे. दागिन्यांची मागणी मंदावली आहे आणि केंद्रीय बँकांनी केलेली खरेदीही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे. मात्र गोल्ड ईटीएफ (Gold ETF) हा एक भाग मजबूत राहिला आहे. यात गुंतवणूकदारांची आवड वाढली आहे आणि त्यांची गुंतवणूक गेल्या दोन वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. तज्ज्ञांनुसार चार्टमध्ये सोन्याच्या किमती सध्या एका मर्यादेत आहेत. डॉलर इंडेक्समध्ये वाढ झाल्याने सोन्यावर दबाव आहे. येत्या 2-3 महिन्यांत सोन्याचा भाव 2-3 टक्के वर किंवा खाली जाऊ शकतो. पण 6-8 महिन्यांत 10-15 टक्क्यांपर्यंतच्या घसरणीची शक्यता वर्तवत आहेत.
चांदी:
चांदीच्या दरात सध्या मोठी वाढ दिसून आली आहे. जागतिक स्तरावर व्यापार वेगाने होत आहे. जर डॉलर इंडेक्स वाढत राहिला. तर चांदीच्या किमतींवरही दबाव येऊ शकतो. नजीकच्या भविष्यात (2-3 महिने) चांदीमध्ये 2-4 टक्क्यांची छोटी वाढ दिसू शकते. पण दीर्घकाळात म्हणजे पुढील 6-8 महिन्यांत त्यातही घसरण होण्याची जास्त शक्यता आहे.
मागणीचे घटक
सण आणि लग्नसोहळ्यांमध्ये दागिन्यांची मागणी नक्कीच वाढेल. पण वाढलेल्या किमतींमुळे विक्रीची एकूण मात्रा (टनांमध्ये) कमी राहू शकते. एकंदरीत जॅक्सन हॉलची बैठक सोने-चांदीची अल्पकालीन दिशा निश्चित करेल. तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी येणाऱ्या महिन्यांमध्ये चांगल्या खरेदीची संधी निर्माण होऊ शकते.