नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक झेप घेतली आहे. सलग तिसऱ्या दिवशी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या तीन व्यापार सत्रांमध्ये सोने तब्बल 6,000 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम वाढले आहे, तर चांदीनेही नवा उच्चांक गाठला आहे.
advertisement
सोन्याचा विक्रमी भाव
बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 2,600 रुपयांनी वाढून 26,600 रुपये प्रति 10 ग्रॅम या नव्या सर्वकालिक उच्चांकावर पोहोचले. सोमवारी सोन्याने 2,700 रुपयांची झेप घेतली होती, तर मंगळवारी 99.9 टक्के शुद्धतेचे सोने 700 रुपयांनी वाढून 1,24,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
म्हणजेच, केवळ तीन दिवसांच्या कालावधीत सोन्याने विक्रमी वेग दाखवत गुंतवणूकदारांच्या नजरा पुन्हा आपल्या दिशेने वळवल्या आहेत.
चांदीचा झळाळता विक्रम
बुधवारी चांदीच्या किंमतींमध्येही 3,000 रुपयांची वाढ झाली आणि ती 1,57,000 रुपये प्रति किलो (सर्व करांसह) या पातळीवर पोहोचली — जी तिच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक किंमतीच्या जवळ आहे. मंगळवारी चांदी 1,54,000 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, तर सोमवारी तिने 1,57,400 रुपये प्रति किलोचा विक्रम केला होता. म्हणजेच सोन्यासोबतच चांदीनेही गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनत पुन्हा एकदा बाजार तापवला आहे.
जागतिक बाजारातही तेजी
केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सराफा दरांमध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. Spot Gold सुमारे 2 टक्क्यांनी वाढून 4,049.59 डॉलर्स प्रति औंस या सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचले. तर Spot Silver 2 टक्क्यांहून अधिक वाढून 48.99 डॉलर्स प्रति औंस या पातळीवर पोहोचली.
जागतिक अस्थिरता आणि धोका टाळण्याच्या मानसिकतेमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे – म्हणजेच सोने आणि चांदीकडे – वळले आहेत. त्यामुळेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारांत मौल्यवान धातूंच्या किंमतींनी भरारी घेतली आहे.
किंमती वाढण्यामागील कारणं
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील सरकारी शटडाउन, भू-राजकीय तणाव, आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता या घटकांमुळे सोन्या-चांदीत गुंतवणुकीला प्रचंड चालना मिळाली आहे. कोटक सिक्युरिटीजच्या जिंस संशोधन विभागाच्या ए.व्ही.पी. कायनात चैनवाला यांनी सांगितले की- अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबतच्या चिंता आणि सरकारी बंदमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली आहे. याच कारणामुळे हाजिर सोने पहिल्यांदाच 4,000 डॉलर्स प्रति औंस या महत्त्वाच्या टप्प्यापलीकडे गेले.
या सगळ्या घटकांमुळे सोने आणि चांदी दोन्हींच्या दरात ऐतिहासिक वाढ होत असून, सराफा बाजारात पुन्हा एकदा ‘सोन्याचा काळ’ परत आल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये व्यक्त केली जात आहे.