मुंबई: गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला सोन्याचा तेजीचा प्रवास आजही कायम आहे. 2 सप्टेंबर रोजी सोन्याने एप्रिल 2022 मध्ये बनवलेला आपला जुना विक्रम मोडून एक नवा सर्वकालिक उच्चांक गाठला आहे. 2 सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये 3,508.79 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचली. यापूर्वीचा उच्चांक 22 एप्रिल 2025 रोजी 3,500 डॉलर होता.
advertisement
तीन वर्षांपूर्वी सोन्याची किंमत सुमारे 1575 डॉलर होती. तिथून आता ती 3,500 डॉलरच्या जवळ पोहोचली आहे. म्हणजेच सोन्याच्या किमतीत १,९०० डॉलरहून अधिक वाढ झाली आहे. केवळ तीन वर्षांत सोन्याची किंमत दुप्पटहून अधिक वाढली आहे. जी एकूण 122% ची वाढ दर्शवते. याचा अर्थ सोन्याने वार्षिक 30% चा चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (CAGR) नोंदवला आहे.
सोन्याच्या तेजीचे मुख्य कारण काय?
भू-राजकीय अस्थिरता (Geopolitics)
2022 पासून जगातील भू-राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण, चीन आणि तैवान यांच्यातील वाढलेला तणाव, तसेच इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष यामुळे जागतिक वित्तीय व्यवस्थेत भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली. अशा अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानतात. ज्यामुळे सोन्याची मागणी आणि किंमत दोन्ही वाढतात.
मध्यवर्ती बँकांची खरेदी (Central Banks)
भू-राजकीय अस्थिरतेमुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी (Central Banks) मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी सुरू केली. सरासरी 500 टन सोन्याच्या वार्षिक खरेदीच्या तुलनेत मध्यवर्ती बँकांनी 2022 मध्ये 1,082 टन आणि 2023 मध्ये 1,037 टन सोन्याची खरेदी केली. 2024 मध्ये तर त्यांनी विक्रमी 1,180 टन सोने खरेदी केले. जे 2022 च्या आकडेवारीपेक्षाही जास्त होते. सलग तीन वर्षांपासून मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. यामुळे एक शंका निर्माण होते, की मध्यवर्ती बँकांना अशी कोणतीतरी माहिती आहे जी सामान्य गुंतवणूकदारांना नाही?
सोन्याच्या किमतीतील पुढची मोठी वाढ तेव्हा दिसून आली. जेव्हा मध्यवर्ती बँकांनी प्रत्यक्ष सोन्याची वाहतूक सुरू केली. बँक ऑफ इंग्लंडसारख्या मोठ्या भांडारातून अनेक देशांनी आपले सोने परत आपल्या देशात आणायला सुरुवात केली. भारत आणि अमेरिका यांसारख्या देशांनीही हा ट्रेंड अवलंबलेला दिसतो.
ट्रंप यांचे नवीन टॅरिफ धोरण (Trump Tariffs)
2025 च्या सुरुवातीला जेव्हा ट्रंप यांनी पहिल्यांदा टॅरिफची घोषणा केली. तेव्हा सोन्याची किंमत सुमारे 2,900 डॉलर होती. सध्याच्या व्यापार युद्धाने या वर्षी सोन्याच्या किमतीतील वाढ कायम ठेवली आहे. देशांमधील व्यापारात अनिश्चितता असल्यामुळे सोन्याची सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी कायम राहण्याची अपेक्षा आहे. जर ही अनिश्चितता कायम राहिली आणि आर्थिक वाढ मंदावली, तर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक (Federal Reserve) व्याजदर कमी करू शकते. याचा परिणाम म्हणून अमेरिकन डॉलर कमजोर होईल आणि सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.