केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2025 पासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवा नियम लागू करण्याची तयारी केली. सुरुवातीला हा नियम ऐच्छिक असणार आहे, म्हणजेच ग्राहकाला हॉलमार्क असलेली किंवा नसलेली चांदीची ज्वेलरी खरेदी करण्याचा पर्याय असेल. मात्र, भविष्यात सोन्याप्रमाणेच चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉलमार्किंग अनिवार्य होण्याची शक्यता आहे.
काय आहे नवा बदल?
भारतीय मानक ब्युरो (BIS) ने चांदीच्या शुद्धतेसाठी सहा मानक ठरवले आहेत. त्यानुसार 800,835, 900, 925, 970 आणि 990. या नव्या नियमानुसार, आता प्रत्येक हॉलमार्क असलेल्या चांदीच्या दागिन्यावर 6 अंकी 'युनिक कोड' (HUID) असेल. या कोडमुळे दागिन्याची शुद्धता किती आहे आणि तो खरा आहे की बनावट, हे लगेच ओळखता येईल. यामुळे जुन्या हॉलमार्किंग प्रणालीपेक्षा ही नवीन पद्धत अधिक पारदर्शक असणार आहे. यामुळे फसवणूक टाळता येणार आहे.
advertisement
1 ग्रॅम Gold घ्यायला एक पगार द्यावा लागणार, बाप्पाचं आगमन होताच सोन्या-चांदीचे दर वाढले
हॉलमार्किंग का आवश्यक आहे?
हॉलमार्किंग म्हणजे कोणत्याही धातूची शुद्धता प्रमाणित करणे. बीआयएसच्या प्रयोगशाळेत दागिन्यांची तपासणी करून त्यावर विशिष्ट चिन्ह (हॉलमार्क) लावण्यात येते. यामुळे ग्राहक पूर्ण विश्वासाने दागिने खरेदी करू शकतो. हॉलमार्किंगमुळे दागिन्यांमध्ये होणारी भेसळ थांबवता येते आणि ग्राहकांना त्यांच्या पैशाचे योग्य मूल्य मिळते.
ग्राहकांना नेमका काय फायदा होणार?
सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक चांदीच्या दागिन्यांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. पण नव्या हॉलमार्क आणि एचयूआयडी नंबरमुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल. ग्राहक आता बीआयएस केअर ॲप वापरून व्हेंरीफाय एचयुआयडी फीचरच्या मदतीने दागिन्यांवरील कोड खरा आहे की नाही हे सहज तपासू शकतील. यामुळे चांदीच्या दागिन्यांची खरेदी अधिक सुरक्षित होईल.
सोन्याप्रमाणेच चांदीचे नियम
2021 मध्ये सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले होते, त्याचप्रमाणे आता चांदीवरही हे नियम लागू होत आहेत. यामागे दागिन्यांच्या बाजारात अधिक पारदर्शकता आणणे आणि ग्राहकांना शुद्ध उत्पादन देणे, हाच उद्देश आहे. 1 सप्टेंबरनंतर ग्राहकांकडे हॉलमार्क आणि विना-हॉलमार्क असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. मात्र, जाणकारांच्या मते, ग्राहक हळूहळू हॉलमार्क असलेल्या दागिन्यांनाच अधिक पसंती देतील. यामुळे केवळ ग्राहकांचाच फायदा होणार नाही, तर संपूर्ण दागिने उद्योगातही विश्वासार्हता वाढेल.