बेंगळुरू: EDने बेंगळुरू एक मोठी कारवाई केली आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या कारवाईत तब्बल 50.33 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (Directorate of Enforcement - ED) 9 ऑक्टोबर 2025 रोजी बेंगळुरू झोनल ऑफिसमार्फत मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीच्या प्रकरणात शोधमोहीम (search operations) राबवली.
advertisement
या छाप्यात चल्लेकेरे येथील दोन लॉकरमधून 24 कॅरेट सोन्याचे सुमारे 40 किलो बिस्किटे (bullion) जप्त करण्यात आली असून, त्याची अंदाजे किंमत 50.33 कोटी इतकी आहे.
यापूर्वीही ईडीने या प्रकरणात 103 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ज्यात सुमारे 21 किलो सोन्याचे बिस्किटे, रोकड, सोने-चांदीचे दागिने, बँक खाती आणि उच्च श्रेणीची वाहने यांचा समावेश होता. अशा प्रकारे या प्रकरणातील एकूण जप्तीची रक्कम आतापर्यंत 150 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
ही शोधमोहीम आणि गुन्ह्यातून मिळालेल्या अवैध पैशाचा (Proceeds of Crime) मागोवा घेण्याची प्रक्रिया मुख्य आरोपी के. सी. वीरेंद्र (आमदार, चित्रदुर्ग जिल्हा) यांच्या न्यायालयीन कोठडीत असताना करण्यात आली.
बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी
ईडीच्या तपासात उघड झाले आहे की के. सी. वीरेंद्र यांनी आपल्या कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने अनेक बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी वेबसाइट्स — जसे की King567, Raja567 इत्यादी — चालवल्या. या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली.
खेळाडूंकडून जमा होणारा पैसा FonePaisa सारख्या विविध पेमेंट गेटवेद्वारे जमा केला जात असे. त्यानंतर हा पैसा देशभरातील विविध “म्युल अकाउंट्स” (mule accounts) म्हणजे इतरांच्या नावावर तयार केलेली बोगस खाती यांच्या माध्यमातून फिरवला जात असे.
ईडीच्या तपासात असेही आढळले आहे की या ऑनलाइन सट्टेबाजी अॅप्सचा संबंध देशभरातील काही सायबर गुन्ह्यांशी आहे. गुन्हेगारांनी लहानशा मोबदल्यात व्यक्तींच्या नावाने बनावट खाते (mule accounts) उघडून घेतली आणि त्यांचा वापर पैसे वळवण्यासाठी केला. या बेकायदेशीर सट्टेबाजी वेबसाइट्सचा एकूण आर्थिक व्यवहार (turnover) 2000 कोटींपेक्षा जास्त असल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
परदेश प्रवास आणि लक्झरी खर्चासाठी ऑनलाइन पैशांचा वापर
के. सी. वीरेंद्र, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांनी परदेश प्रवास, व्हिसा, आणि आतिथ्य (hospitality) सेवांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. आणि हा सर्व खर्च या म्युल अकाउंट्समधून वळवलेल्या पैशातूनच करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
याशिवाय मार्केटिंग, बल्क एसएमएस सेवा, वेबसाइट होस्टिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) इत्यादींसाठीचा खर्चही के. सी. वीरेंद्र आणि त्यांच्या सहयोगींनी या खात्यांमधूनच भागवला. ईडीच्या पुराव्यांनुसार या व्यवहारांसाठी वापरलेले पैसे बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीमधून आले होते. आणि त्यांचा स्त्रोत लपवण्यासाठी हे पैसे अनेक मध्यस्थ खात्यांमधून वळवले गेले.