मुंबई: शापूरजी पल्लोनजी (SP) ग्रुपसाठी पुढील काही महिने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. कारण डिसेंबरपर्यंत ग्रुपला 1.2 अब्ज डॉलर (सुमारे 10,000 कोटी रुपयांहून अधिक) इतकं कर्ज फेडायचं आहे. ही रक्कम केवळ मूळ कर्जाचीच नसून त्यात व्याजाचीही भर आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी SP ग्रुपने टाटा सन्समधील आपली संपूर्ण हिस्सेदारी गहाण ठेवली आहे, असं या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे.
advertisement
मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, SP ग्रुप यापूर्वीच 3.2 अब्ज डॉलरचं कर्ज रीफायनान्स करून दिलं आहे. मात्र आता डिसेंबरपूर्वीच उर्वरित 1.2 अब्ज डॉलर परतफेड करायचे आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही देय रक्कम चुकवणं ग्रुपसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतं.
55,000 ते 60,000 कोटींचं एकूण कर्ज
सध्या शापूरजी पल्लोनजी ग्रुपवर एकूण 55,000 ते 60,000 कोटी इतकं कर्ज आहे. त्यात केवळ ग्रुप कंपन्यांचंच नव्हे तर मिस्त्री कुटुंबावर असलेलं 25,000 ते 30,000 कोटींचं वैयक्तिक कर्ज देखील समाविष्ट आहे. आर्थिक तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, डिसेंबरपर्यंत या रकमेची परतफेड करणं SP ग्रुपसाठी कठीण होऊ शकतं.
टाटा सन्समधील SP ग्रुपची हिस्सेदारी सुमारे 18% पेक्षा जास्त आहे. पण या हिस्सेदारीची विक्री करून निधी उभा करणं सोपं नाही. कारण टाटा सन्स ही नॉन-लिस्टेड कंपनी आहे. म्हणजे तिचे शेअर्स शेअर बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे टाटा ग्रुपच्या संमतीशिवाय SP ग्रुप आपल्या शेअर्सची विक्री कोणत्याही बाहेरील खरेदीदाराला करू शकत नाही.
कर्ज मालमत्ता आणि टाटा सन्सच्या शेअर्सवर
SP ग्रुपने घेतलेलं हे कर्ज आपल्या विविध मालमत्तांवर (assets) गहाण ठेवून घेतले आहे. त्यात टाटा सन्समधील हिस्सेदारी देखील गहाण ठेवण्यात आली आहे. परंतु टाटा सन्सचे शेअर्स बाजारात न लिस्टेड असल्याने, या शेअर्सची विक्री करून कर्ज फेडणं प्रत्यक्षात गुंतागुंतीचं काम ठरू शकतं. बँका आणि एनबीएफसी आता SP ग्रुपकडून “मॉनेटायझेशन प्लॅन” म्हणजेच मालमत्ता विक्रीतून कर्ज फेडण्याची ठोस योजना मागू शकतात.
टाटा सन्सचे लिस्टिंग
टाटा ग्रुपने अद्याप SP ग्रुपला आपली हिस्सेदारी विक्री करण्यास परवानगी दिलेली नाही. या संदर्भात शापूरजी पल्लोनजी ग्रुपकडे विचारणा करण्यात आली होती, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.सूत्रांच्या माहितीनुसार SP ग्रुपचं नेहमीच असं मत राहिलं आहे की- जर टाटा सन्सची लिस्टिंग झाली, तर सर्व शेअरहोल्डर्सच्या अडचणी संपतील. लिस्टिंग झाल्यानंतर SP ग्रुपला आपल्या हिस्सेदारीचे शेअर्स खुले बाजारात विकता येतील आणि त्यामुळे त्यांच्या कर्जाची परतफेड करणे सुलभ होईल.
याशिवाय टाटा सन्सची लिस्टिंग झाल्यास SP ग्रुपला कराच्या दृष्टीने (tax-wise) मोठा फायदा होऊ शकतो. सध्या जर SP ग्रुपने टाटा सन्सच्या शेअर्सचं बायबॅकद्वारे विक्री केली, तर त्यांना सुमारे 36% कर भरावा लागेल. परंतु जर टाटा सन्सची लिस्टिंग झाली आणि खुले बाजारात हे शेअर्स विकले गेले, तर केवळ 12% कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. म्हणजेच हा पर्याय अधिक फायदेशीर ठरेल.
‘स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट्स’ची मोठी भूमिका
शापूरजी पल्लोनजी ग्रुपच्या कर्जात स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीचा मोठा वाटा आहे. हीच ती संस्था आहे जिने 2021 साली Ares Management आणि Farallon Capital या आंतरराष्ट्रीय फंडांकडून सुमारे 2.6 अब्ज डॉलरचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज टाटा सन्समधील हिस्सेदारी गहाण ठेवून घेतल्याचं सांगितलं जातं.
शापूरजी पल्लोनजी ग्रुप हा भारतातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित औद्योगिक घराण्यांपैकी एक आहे. पण टाटा सन्समधील हिस्सेदारीविषयी चाललेला वाद, वाढतं कर्ज आणि बाजारातील मंदी या तिन्ही कारणांनी ग्रुप सध्या आर्थिक दबावाखाली आला आहे.
आता सगळ्यांचे लक्ष यावर आहे की, SP ग्रुप डिसेंबरपूर्वी आपले देयक कसे फेडतो आणि टाटा सन्ससोबतचा ताणलेला आर्थिक संबंध पुढे कोणत्या वळणावर जातो. कारण जर हे कर्ज वेळेवर फेडलं गेलं नाही; तर भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात एका मोठ्या वित्तीय संकटाची नोंद होऊ शकते.